सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अमेरिकेशी तणावात इराणचा नवा डाव; पाकिस्तानला बाजूला ठेवत रशियाकडे मध्यस्थीची सूत्रे?
  • बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार? उदय सामंतांशी महत्त्वाची चर्चा, विधानपरिषद निवडणुकीपूर्वी मोठ्या निर्णयाची शक्यता
 जिल्हा

‘मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचा ‘महाराष्ट्र दिनी’ लोकार्पण सोहळा

डिजिटल पुणे    30-04-2026 11:24:25

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (मर्या.) यांच्या वतीने यशवंतराव चव्हाण मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाच्या क्षमता वाढीअंतर्गत उभारण्यात आलेल्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र दिनी १ मे रोजी पार पडणार आहे. राज्यातील वाहतूक व्यवस्थेला नवे बळ देणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.

या ‘मिसिंग लिंक’ चे उद्घाटन शुक्रवार, दि. १ मे २०२६ रोजी दु. १२:३० वाजता मिसिंग लिंक वरील पूल क्र.१, खोपाली एक्झिटजवळ, यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग, जि. रायगड या ठिकाणी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून, केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार उपस्थिती राहणार आहे.

कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात रुंद बोगदा म्हणून नोंद

मिसिंग लिंकमुळे भारतातील पहिला एक्सप्रेस-वे आता अधिक वेगवान आणि सुरक्षित होत आहे. मिसिंग लिंकमुळे वेळ आणि इंधन वाचविणारा सुरक्षित आणि वेगवान प्रवासाचा अनुभव  मिळणार आहे.  मिसिंग लिंक जगातील सर्वात रुंद बोगदा (२३.५ मीटर) असून  लोणावळा तलावाच्या १८० मीटर खालून खोदलेला बोगदा आहे.  या ठिकाणी ६५० मीटर केबल-स्टेड ब्रिजसह भारतातील सर्वात उंच रस्त्यावरील पूल पायलॉन उंची (१८२ मीटर) असून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वांत रुंद बोगदा म्हणून नोंद झालेली आहे.

हा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि प्रवासाचा कालावधी लक्षणीयरित्या घटवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अत्याधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर करून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीनेही मोठी सुधारणा होणार आहे.राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासातील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, या प्रकल्पामुळे आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीलाही गती मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.


 Give Feedback



 जाहिराती