सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • सुरतजवळ दोन एसटी बसची समोरासमोर धडक; बसला आग लागून 7 प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी
  • : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुषांकडून सगळे पैसे वसूल करणार; देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडवर
  • मान्सूनपूर्व पावसाचा कहर! राज्यभर शेतीचे मोठे नुकसान; भिंत कोसळून मुलीचा मृत्यू, फळबागा उद्ध्वस्त
  • तुकाराम मुंढेनी एफडीएचा चार्ज घेताच भेसळखोरांवर आभाळ कोसळलं; दोन दिवसांत आणखी 40 छापे, पुणे आणि कोकणात मोठी कारवाई
  • देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळला नाही; विधान परिषदेवरून रामदास आठवलेंचा निर्वाणीचा इशारा, म्हणाले, 'माझे नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासोबत चांगले संबंध...'
 विश्लेषण

मान्सूनपूर्व पावसाचा कहर! राज्यभर शेतीचे मोठे नुकसान; भिंत कोसळून मुलीचा मृत्यू, फळबागा उद्ध्वस्त

डिजिटल पुणे    02-06-2026 12:04:17

परभणी : महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यापूर्वीच मान्सूनपूर्व पावसाने अनेक जिल्ह्यांत हाहाकार माजवला आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह विविध भागांत जोरदार पाऊस, वादळी वारे, गारपीट आणि विजांच्या कडकडाटामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतीपिके, फळबागा, जनावरे आणि घरांचे नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे.

परभणी जिल्ह्यातील इंदेवाडी येथे वादळी वाऱ्यानंतर घराची भिंत कोसळून 11 वर्षीय दिपाली नंदगे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. गंगाखेड तालुक्यातील गौंडगाव येथे वीज कोसळल्याने शेतकरी किरण कराळे यांचा एक बैल आणि एक गाय दगावली. तसेच पोखरणी रेल्वे स्थानकावरील पत्र्याचे शेड उडून ओव्हरहेड वायरवर पडल्याची घटना घडली.

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात गारपीट आणि मुसळधार पावसामुळे केळी व जांभूळ बागांचे मोठे नुकसान झाले. चिखली गावातील शेतकरी दिनकर लाड यांनी घेतलेले केळी आणि पांढऱ्या जांभळाचे पीक अक्षरशः उद्ध्वस्त झाले. बाजारात चांगला भाव मिळण्याच्या अपेक्षेत असताना लाखोंचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, शेगाव आणि खामगाव तालुक्यांत चक्रीवादळासह झालेल्या पावसामुळे हजारो हेक्टरवरील केळी आणि संत्रा बागा जमीनदोस्त झाल्या. निर्यातीसाठी तयार असलेल्या केळी पिकाचे मोठे नुकसान झाल्याने उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातही वादळी वाऱ्याने केळीच्या शेकडो एकर बागा आडव्या झाल्या. अनेक घरांवरील पत्रे उडून गेली असून पोमलवाडी येथे घराची भिंत कोसळून वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाला. प्रशासनाने नुकसानग्रस्त भागात पंचनामे सुरू केले असून शेतकऱ्यांकडून तातडीच्या मदतीची मागणी होत आहे.मान्सूनपूर्व पावसाच्या या तडाख्यामुळे राज्यातील अनेक भागांत शेतीचे मोठे नुकसान झाले असून बळीराजासमोर पुन्हा एकदा आर्थिक संकट उभे ठाकले आहे.


 Give Feedback



 जाहिराती