सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: महेश ट्युटोरियल्स क्लासच्या शाखा धडाधड बंद, विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये फी घेतली अन् 10 जुलैला गाशाच गुंडाळला
  • एकनाथ शिंदेंच्या काळातील आणखी एक योजना बंद, रेशनकार्डधारक कुटुंबातील महिलांना मिळणारी साडी बंद
 DIGITAL PUNE NEWS

'सोनम वांगचुक देशासाठी महत्त्वाचे; सरकारची भूमिका असंवेदनशील', सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

डिजिटल पुणे    17-07-2026 17:00:36

पुणे : NEET परीक्षा पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे ज्येष्ठ समाजसुधारक, पर्यावरण कार्यकर्ते आणि पद्मश्री पुरस्कार विजेते सोनम वांगचुक गेल्या 19 दिवसांपासून उपोषण करत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर तीव्र टीका केली. सोनम वांगचुक हे देशासाठी महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व असून, त्यांच्या आंदोलनाकडे सरकारने दाखवलेले दुर्लक्ष ही अत्यंत असंवेदनशील बाब असल्याचे त्या म्हणाल्या.

'सरकारने तातडीने संवाद साधावा'

या प्रश्नावर सरकारने पुढाकार घेऊन चर्चेचा मार्ग स्वीकारायला हवा होता. मात्र, एवढे दिवस उलटूनही सरकारकडून कोणताही प्रतिनिधी आंदोलनस्थळी न गेल्याने सरकारची उदासीनता स्पष्ट होत असल्याची टीका सुळेंनी केली. NEET पेपरफुटीमुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाला असून, हा केवळ काही विद्यार्थ्यांचा नव्हे तर संपूर्ण देशातील पालक आणि विद्यार्थ्यांचा प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले.

'जनतेचा आंदोलनाला मोठा पाठिंबा'

सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांच्या समर्थनार्थ आंदोलनस्थळी जाणार असल्याची माहिती दिल्यानंतर आपल्या मतदारसंघातील अनेक नागरिकांनी त्याचे स्वागत केल्याचे सुळे म्हणाल्या. सरकारने आता तरी जागे होऊन या गंभीर विषयात हस्तक्षेप करावा आणि तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली.

'उपोषण सोडावे, पण मागण्या मान्य व्हाव्यात'

सोनम वांगचुक यांनी आरोग्याचा विचार करून उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती करतानाच त्यांच्या मागण्या योग्य असून त्या पूर्ण होणे आवश्यक असल्याचे सुळे म्हणाल्या. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून या लढ्यात पूर्ण ताकदीने उभे राहू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

संविधान संशोधन विधेयकावरही भूमिका स्पष्ट

यावेळी सुळेंनी संविधान संशोधन विधेयकावरही प्रतिक्रिया देत या विषयावर अधिक व्यापक चर्चा होणे गरजेचे असल्याचे सांगितले. या विधेयकाला आमचा विरोध असून, ते लागू होऊ नये ही आमची स्पष्ट भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले.

'भावाची शेवटची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला'

राजकीय घडामोडींवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझ्या भावाच्या निधनानंतर त्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन देशाची सेवा करावी, ही त्यांची शेवटची इच्छा होती. ती पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले, मात्र दुसऱ्या बाजूकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने तो विषय आता संपला आहे. आम्ही पुढेही स्वाभिमानाने जनतेची सेवा करत राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले.


 Give Feedback



 जाहिराती