सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा देताच महाराष्ट्रात मोठी घडामोड, देवेंद्र फडणवीसांना तातडीने दिल्लीतून बोलावणं
  • आषाढी एकादशीला विठुरायाच्या पंढरीत अनर्थ घडला, वारीच्या बंदोबस्तासाठी आलेल्या SRPF जवानाने स्वतःवर गोळ्या झाडत आयुष्य संपवलं
  • अखेर धर्मेंद्र प्रधानांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला, जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश
 राज्य

जंतर-मंतरवरून सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी हटवलं; अभिजीत दीपके यांचा गंभीर आरोप, म्हणाले- 'आंदोलकांना मारहाण करून बळजबरीने हटवलं'

डिजिटल पुणे    18-07-2026 11:57:38

दिल्ली : NEET परीक्षेतील कथित अनियमितता, प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांबाबत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरण अभ्यासक सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाचा आज (18 जुलै) 21 वा दिवस आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला देशभरातील विद्यार्थी, विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून पाठिंबा मिळत असतानाच शनिवारी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई करत सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवले. त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दिल्ली पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात करत जंतर-मंतर परिसर ताब्यात घेतला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी पोलिसांच्या कारवाईला विरोध केला. त्यामुळे काही काळ आंदोलनस्थळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. पोलिस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचेही समोर आले असून, या कारवाईनंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला.

दरम्यान, या संपूर्ण घटनेवर कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी)चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर गंभीर आरोप केले. "आंदोलनकर्त्यांना मारहाण करण्यात आली. सोनम वांगचुक यांच्यासह अनेकांना बळजबरीने आंदोलनस्थळावरून हटवण्यात आले. शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनावर अशी कारवाई लोकशाहीसाठी धोकादायक आहे," असा दावा त्यांनी आपल्या पोस्टमध्ये केला. मात्र, दीपके यांनी केलेल्या आरोपांबाबत दिल्ली पोलिसांकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू म्हणजे NEET परीक्षेतील कथित घोटाळा, प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना आणि स्पर्धा परीक्षांच्या व्यवस्थेतील पारदर्शकतेचा अभाव. आंदोलनकर्त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या कामकाजाची निष्पक्ष चौकशी, प्रश्नपत्रिका फुटीच्या सर्व प्रकरणांचा पारदर्शक तपास आणि स्पर्धा परीक्षा व्यवस्थेत व्यापक सुधारणा करण्याची मागणीही केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली होती. दीर्घकाळ अन्नत्याग केल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. अशा परिस्थितीत पोलिसांनी त्यांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात हलविल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या या कारवाईनंतर आंदोलनाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विरोधकांनी या कारवाईवर सरकारवर टीका सुरू केली असून, तर दुसरीकडे प्रशासनाकडून पुढील भूमिका काय असेल, याकडे देशभराचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती