मुंबई : मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेता आणि विनोदवीर कुशल बद्रिके आता प्रेक्षकांच्या आवडत्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमात विशेष भूमिकेत दिसणार आहेत. 'चला हवा येऊ द्या' या गाजलेल्या कॉमेडी शोमधून आपल्या भन्नाट विनोदशैलीने प्रेक्षकांची मनं जिंकणारे कुशल आता नव्या मंचावर हास्याचा जल्लोष रंगवण्यासाठी सज्ज झाले आहेत. सोनी मराठीने सोशल मीडियावर या भागाचा प्रोमो शेअर केल्यानंतर चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाने जवळपास दशकभर महाराष्ट्रातील प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराने आपल्या वेगळ्या शैलीत प्रेक्षकांवर छाप पाडली असून, त्यामध्ये कुशल बद्रिके यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. मालिका, चित्रपट, वेब सीरिज आणि रंगभूमीवरही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यामुळे त्यांच्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील एन्ट्रीची चर्चा सध्या रंगू लागली आहे.
समोर आलेल्या प्रोमोमध्ये अरुण कदम, प्रियदर्शिनी इंदलकर, श्रमेश बेटकर आणि दत्तू मोरे यांच्यासोबत कुशल बद्रिके भन्नाट स्किट सादर करताना दिसत आहेत. स्टायलिश अंदाजात त्यांची एन्ट्री होताच वातावरणात रंगत येते. त्यानंतर प्रियदर्शिनी इंदलकर यांच्यासोबतचा मिश्किल संवाद आणि दत्तू मोरे यांच्यासोबतची विनोदी जुगलबंदी प्रेक्षकांना खळखळून हसवणारी असल्याची झलक प्रोमोमध्ये पाहायला मिळते.
प्रोमो प्रदर्शित होताच सोशल मीडियावर चाहत्यांनी आनंद व्यक्त केला असून, "कुशल बद्रिके पुन्हा कॉमेडीच्या मंचावर पाहायला मिळणार" अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चा आगामी भाग अधिक रंगतदार ठरणार असल्याची चर्चा रंगली असून, हा विशेष भाग पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत