सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा देताच महाराष्ट्रात मोठी घडामोड, देवेंद्र फडणवीसांना तातडीने दिल्लीतून बोलावणं
  • आषाढी एकादशीला विठुरायाच्या पंढरीत अनर्थ घडला, वारीच्या बंदोबस्तासाठी आलेल्या SRPF जवानाने स्वतःवर गोळ्या झाडत आयुष्य संपवलं
  • अखेर धर्मेंद्र प्रधानांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला, जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश
 शहर

बारामतीत भीषण अपघातात दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू; घरापासून हाकेच्या अंतरावर काळाचा घाला

डिजिटल पुणे    27-07-2026 15:05:33

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील सुपे येथे रविवारी दुपारी घडलेल्या भीषण अपघातात दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मालवाहतूक ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात सोमनाथ दत्तात्रय ठोंबरे आणि शुभम दत्तात्रय ठोंबरे (रा. शेंडगेवाडी, ता. बारामती) या दोघांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. घरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर हा अपघात घडल्याने ठोंबरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही भाऊ कामानिमित्त मोरगाव येथे गेले होते. काम आटोपल्यानंतर ते त्यांच्या दुचाकीवरून (एमएच ४२ ई १८७८) सुपे येथील घरी परतत होते. दरम्यान, सुपे चौफुला मार्गावरील अहिल्यादेवी चौकात वळण घेत असताना त्यांच्या दुचाकीचा अचानक तोल गेला आणि वाहन घसरले. त्याचवेळी मोरगावच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या मालवाहतूक ट्रकच्या (एमएच १० सीआर ४१९९) मागील चाकाखाली दोघेही सापडल्याने भीषण अपघात झाला.

या अपघातात सोमनाथ ठोंबरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या शुभम ठोंबरे यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्यांनाही मृत घोषित केले. त्यामुळे काही तासांच्या अंतरातच एकाच कुटुंबातील दोन तरुण मुलांचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांसह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात इतका भीषण होता की परिसरात काही काळ एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच सुपे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातानंतर वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.

या दुर्दैवी घटनेचा व्हिडिओ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही रेकॉर्ड झाला असून, त्याच्या आधारे पोलिसांकडून अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास केला जात आहे. या प्रकरणी सुपे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे पुढील तपास करत आहेत.एकाच घरातील दोन सख्ख्या भावांचा अशा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याने शेंडगेवाडीसह संपूर्ण बारामती तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून, ठोंबरे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


 Give Feedback



 जाहिराती