मुंबई : दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 'जेन-झी' पिढी देशभर चर्चेत असतानाच पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी या पिढीबाबत केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. कारगिल विजय दिनानिमित्त भोसला मिलिटरी स्कूलच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी वाढत्या स्क्रीन टाइममुळे तरुणांच्या विचारशक्ती, भावनिक संतुलन आणि सामाजिक वर्तनावर परिणाम होत असल्याचे सांगितले. सतत मोबाईलवर राहण्याच्या सवयीमुळे आजच्या पिढीच्या डोक्यात "केमिकल लोचा" झाला असून त्यांना समजावून सांगणेही अवघड बनल्याचे त्यांनी म्हटले.
नांगरे पाटील यांनी तरुणांनी केवळ बौद्धिक नव्हे तर भावनिक आणि सामाजिकदृष्ट्याही सक्षम होणे आवश्यक असल्याचे सांगितले. कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची मानसिक ताकद विकसित करण्यावर त्यांनी भर दिला.
यावेळी त्यांनी पोलिसांच्या कामकाजाचाही उल्लेख केला. पोलीस आणि सीमेवरील जवानांची सेवा कधीही थांबत नाही, मात्र कितीही काम केले तरी टीका आणि शिव्याच जास्त मिळतात. गेल्या काही दिवसांत तर स्वतःलाच अधिक टीकेला सामोरे जावे लागत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.