सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्याहून मुंबईकडे निघाले, मिसिंग लिंक बोगद्यात काळाचा घाला; युवा काँग्रेस नेते तुषार भूमकर यांचा भीषण अपघातात मृत्यू
 शहर

मानव तस्करी विरोधी जागतिक दिनानिमित्त आशा केअर ट्रस्टच्या दोन जनजागृती मोहिमा

डिजिटल पुणे    07-08-2026 16:17:40

पुणे : संयुक्त राष्ट्रसंघाने ३० जुलै हा दिवस "मानव तस्करी विरोधी जागतिक दिन" (World Day Against Trafficking in Persons) म्हणून घोषित केला आहे. या निमित्ताने आशा केअर ट्रस्ट, मनोबल फाउंडेशन आणि प्रकृती यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात मानव तस्करीविरोधी दोन जनजागृती मोहिमा आयोजित करण्यात आल्या.

पहिली पीस वॉक ३१ जुलै २०२६ रोजी फर्ग्युसन कॉलेज (एफ. सी.) रोड येथे आयोजित करण्यात आली. या अभियानाला पुणे पोलिसांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास श्री. कृषिकेश रावळे, आयपीएस, पोलीस उपायुक्त, झोन १, पुणे शहर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे आणि पुणे पोलिसांच्या सक्रिय सहभागामुळे या जनजागृती अभियानाला अधिक बळ मिळाले. या वॉकद्वारे नागरिकांमध्ये मानव तस्करीबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली आणि आजच्या काळातही मानव तस्करी हा गंभीर सामाजिक गुन्हा असल्याचा संदेश देण्यात आला.

दुसरे जनजागृती अभियान ७ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे रेल्वेस्थानकावर रेल्वे सुरक्षा बल (RPF), शासकीय रेल्वे पोलीस (GRP) तसेच डिव्हिजनल रेल्वे व्यवस्थापक (DRM) कार्यालयाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले.

रेल्वेस्थानके ही मानव तस्करीसाठी संवेदनशील ठिकाणे असल्याने प्रवासी आणि नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले. संशयास्पद हालचाली ओळखणे, फसव्या आमिषांपासून सावध राहणे आणि अशा घटनांची त्वरित माहिती संबंधित यंत्रणांना देणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावर्षी संयुक्त राष्ट्रसंघाने मानव तस्करीच्या बदलत्या स्वरूपावर भर दिला असून, ऑनलाइन फसवणूक, बनावट नोकरीच्या संधी, डिजिटल माध्यमांचा गैरवापर आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने होणारे शोषण यांसारख्या नव्या स्वरूपातील धोक्यांविषयी नागरिकांना जागरूक करण्यावर विशेष भर देण्यात आला. या दोन्ही मोहिमांद्वारे नागरिकांना मानव तस्करी आजही अस्तित्वात असून ती काळानुरूप अधिक गुंतागुंतीची होत चालल्याचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.

यावेळी आशा केअर ट्रस्टच्या संस्थापक व अध्यक्षा सौ. शीला शेट्टी म्हणाल्या, "मानव तस्करी हा भूतकाळातील गुन्हा नाही; तो आजही आपल्या समाजात विविध स्वरूपात घडत आहे. आज तस्कर ऑनलाइन फसवणूक, खोट्या नोकरीच्या संधी आणि खोट्या आश्वासनांचा वापर करून असुरक्षित व्यक्तींना जाळ्यात ओढतात. जनजागृती हेच या गुन्ह्याविरुद्धचे सर्वात प्रभावी शस्त्र आहे. प्रत्येक जागरूक नागरिक मानव तस्करीची लक्षणे ओळखू शकतो, संशयास्पद बाबींची माहिती देऊ शकतो आणि एखाद्याचे आयुष्य वाचवू शकतो. मानवी सन्मानाचे रक्षण करणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे."

या दोन्ही जनजागृती मोहिमांद्वारे आशा केअर ट्रस्टने मानव तस्करीविरोधातील लढा अधिक व्यापक करण्याचा संकल्प व्यक्त केला असून, नागरिक, पोलीस यंत्रणा, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन मानव तस्करीमुक्त समाज घडविण्याचे आवाहन केले आहे.


 Give Feedback



 जाहिराती