सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश
  • पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत एक महिन्याआधी पतीचा दुर्दैवी अंत; आता वेदनाविवश झालेल्या पत्नीनंही स्वतःला संपवलं
  • एकनाथ शिंदेंना फक्त आमदारांच्या संख्येवर मुख्यमंत्री बनवण्यात आलं, त्यांनी कोणत्या आधारावर कार्यकारिणी जाहीर केली; ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद, निवडणूक आयोगाची चिरफाड
  • डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
  • 'अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय'; संजय राऊतांचा सनसनाटी दावा
 क्राईम

मोशी कचरा डेपो दुर्घटनेला महिना पूर्ण; पतीच्या मृत्यूच्या धक्क्यातून पत्नीनेही उचलले टोकाचे पाऊल, दोन चिमुकल्या मुलींचे आई-वडिलांचे छत्र हरपले

डिजिटल पुणे    13-08-2026 17:12:03

पुणे : पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपो परिसरातील इमारत दुर्घटनेला आज एक महिना पूर्ण होत असतानाच मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नागेश गायकवाड यांच्या पत्नी सोनाली गायकवाड यांनी रात्री उशिरा आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. सोनाली या अवघ्या २३ वर्षांच्या होत्या. पतीच्या मृत्यूनंतर त्या मानसिक तणावात आणि दुःखात असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.

मोशी कचरा डेपो दुर्घटनेत नागेश गायकवाड यांच्यासह नऊ कामगारांचा मृत्यू झाला होता. दुर्घटनेनंतर अवघ्या महिनाभरातच त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाल्याने गायकवाड कुटुंबावर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोनाली यांच्या मृत्यूची नोंद एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

पतीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याचा प्राथमिक अंदाज

नागेश गायकवाड यांच्या मृत्यूनंतर सोनाली अत्यंत दुःखी आणि तणावाखाली असल्याचे पोलिसांनी सांगितले. पतीला गमावल्याच्या धक्क्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यांच्या मृत्यूपूर्वी कोणतीही सुसाईड नोट आढळली नसल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या या निर्णयामागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.

गायकवाड दांपत्याला दोन मुली आहेत. आई-वडिलांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे या दोन्ही चिमुकल्या मुलींच्या आयुष्यातील आधारच हरपला आहे. एका दुर्घटनेने आधी पती गमावलेल्या सोनाली यांच्या मृत्यूने कुटुंबावर आलेले संकट आणखी गडद झाले आहे.

९ कामगारांचा मृत्यू; १२ जण जखमी

८ जुलै रोजी मोशी कचरा डेपो परिसरात कचऱ्याचा मोठा ढिगारा इमारतीवर कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले. तब्बल ८३ तास बचावकार्य सुरू होते. अखेर बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर नऊ कामगारांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले, तर १२ कामगार जखमी झाले.

या दुर्घटनेनंतर इमारतीच्या बांधकामासह संबंधित परवानग्या, सुरक्षाव्यवस्था आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाले. दुर्घटनेला एक महिना उलटूनही या प्रकरणातील जबाबदारी निश्चित करण्याबाबत कुटुंबीय आणि नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

चौकशी, गुन्हे आणि निलंबनाची कारवाई

दुर्घटनेनंतर शासनाने उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली. कंत्राटदार कंपनीशी संबंधित दोघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी एका व्यक्तीला अटक करण्यात आली. याशिवाय महापालिकेतील अधिकाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली.

पर्यावरण विभागातील संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यानंतर अग्निशमन विभागातील अधिकारी ऋषिकांत चिपाडे यांनाही अनधिकृत बांधकामाला एनओसी दिल्याच्या प्रकरणात निलंबित करण्यात आले. तसेच राष्ट्रीय हरित लवादानेही स्वतंत्र चौकशीचे आदेश दिले आहेत.

मात्र, या कारवाईनंतरही दुर्घटनेला जबाबदार असलेल्या सर्व व्यक्तींवर कारवाई झाली आहे का, हा प्रश्न कायम आहे. तपास नेमका कोणत्या टप्प्यावर आहे आणि मुख्य जबाबदार व्यक्तींवर पुढील कारवाई कधी होणार, याकडे मृतांच्या कुटुंबीयांचे लक्ष लागले आहे.

मृतांच्या कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन; अंमलबजावणीबाबत प्रश्न

दुर्घटनेनंतर मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत, वारसांना नोकरी आणि मुलांच्या शिक्षणासाठी मदत करण्याची आश्वासने देण्यात आली होती. मात्र, जाहीर केलेल्या मदतीपैकी काही मदत अद्याप पूर्णपणे मिळाली नसल्याचा दावा करण्यात येत आहे.

महापालिकेकडून काही मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. मात्र, कंपनीकडून जाहीर करण्यात आलेली मदत आणि शासनाकडून घोषित करण्यात आलेल्या मदतीबाबत अद्याप प्रश्न उपस्थित होत आहेत. मृतांच्या वारसांना नोकरी देण्याबाबतही ठोस निर्णयाची प्रतीक्षा असल्याचे सांगितले जात आहे.

दुर्घटनेला महिना; मात्र प्रश्नांची मालिका कायम

मोशी दुर्घटनेला एक महिना पूर्ण झाला असला तरी या दुर्घटनेमागील नेमकी जबाबदारी, बांधकामाला परवानगी कशी मिळाली, सुरक्षेच्या नियमांचे पालन झाले होते का, संबंधित अधिकाऱ्यांनी वेळीच कारवाई का केली नाही आणि मृतांच्या कुटुंबीयांना जाहीर केलेली संपूर्ण मदत कधी मिळणार, असे अनेक प्रश्न अद्याप चर्चेत आहेत.

दरम्यान, पतीच्या मृत्यूनंतर अवघ्या महिन्याभरात सोनाली गायकवाड यांच्या मृत्यूची घटना समोर आल्याने या दुर्घटनेचा फटका केवळ नऊ कुटुंबांपुरता मर्यादित राहिला नसल्याचे अधोरेखित झाले आहे. एका दुर्घटनेने अनेक कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त केले असून, पीडित कुटुंबीयांना न्याय आणि दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होण्याची प्रतीक्षा आहे.

मोशी दुर्घटनेचा घटनाक्रम

८ जुलै : कचऱ्याचा मोठा ढिगारा इमारतीवर कोसळला.

९ जुलै : दुर्घटनेतील पहिल्या कामगाराचा मृत्यू झाला.

११ जुलै : इमारत अनधिकृत असल्याचा मुद्दा समोर आला.

१२ जुलै : सुमारे ८३ तासांनंतर बचावकार्य पूर्ण झाले. नऊ कामगारांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

१३ जुलै : संबंधित महापालिका अधिकाऱ्यांना नोटीस देण्याचे आदेश.

१४ जुलै : शासनाकडून उच्चस्तरीय चौकशी समितीची नियुक्ती.

१४ जुलै : कंत्राटदार कंपनीशी संबंधित दोघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल.

१५ जुलै : महापालिकेतील अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई.

२१ जुलै : राष्ट्रीय हरित लवादाकडून स्वतंत्र चौकशीचे आदेश.

२७ जुलै : अनधिकृत बांधकामाला एनओसी दिल्याप्रकरणी अग्निशमन विभागातील अधिकाऱ्याचे निलंबन.

१३ ऑगस्ट : दुर्घटनेतील मृत नागेश गायकवाड यांच्या पत्नी सोनाली गायकवाड यांच्या मृत्यूची घटना समोर आली.


 Give Feedback



 जाहिराती