सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश
  • पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत एक महिन्याआधी पतीचा दुर्दैवी अंत; आता वेदनाविवश झालेल्या पत्नीनंही स्वतःला संपवलं
  • एकनाथ शिंदेंना फक्त आमदारांच्या संख्येवर मुख्यमंत्री बनवण्यात आलं, त्यांनी कोणत्या आधारावर कार्यकारिणी जाहीर केली; ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद, निवडणूक आयोगाची चिरफाड
  • डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
  • 'अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय'; संजय राऊतांचा सनसनाटी दावा
 जिल्हा

‘एसटी’च्या ‘एनसीएमसी स्मार्टकार्ड’साठी १ कोटींहून अधिक प्रवाशांची नोंदणी- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

डिजिटल पुणे    13-08-2026 18:02:45

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि डिजिटल प्रवासाचा अनुभव देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या एनसीएमसी स्मार्ट कार्डला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. १२ ऑगस्टपर्यंत राज्यात तब्बल १ कोटी १ लाख ७३ हजार ८३८ प्रवाशांनी एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असून, त्यापैकी ६४ लाख ९१ हजार ६५ कार्डे सक्रिय झाली आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

एनसीएमसी स्मार्ट कार्डच्या माध्यमातून एसटी प्रवासातील तिकीट व्यवहार अधिक सुलभ आणि कॅशलेस करण्याच्या दिशेने महामंडळाने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. पहिल्या टप्प्यात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना एनसी एमसी स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात येत आहे. येत्या १ सप्टेंबरपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे अद्याप नोंदणी न केलेल्या पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर एनसी एमसी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी करावी, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

मंत्री सरनाईक म्हणाले, “एसटी ही केवळ प्रवासाची सेवा नसून महाराष्ट्राच्या जनजीवनाशी जोडलेली लोकवाहिनी आहे. या ‘लालपरी’चा प्रवास काळानुरूप अधिक आधुनिक, डिजिटल आणि प्रवाशांसाठी सुलभ करण्याचा आमचा प्रयत्न आहे. NCMC स्मार्ट कार्डला मिळणारा प्रतिसाद हा प्रवाशांचा या डिजिटल परिवर्तनावरील विश्वास दर्शवितो. भविष्यात एसटीच्या सेवांमध्ये तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून प्रवाशांचा वेळ वाचविणे आणि त्यांचा प्रवास अधिक सोयीस्कर करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”

१५ ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना एनसीएमसी कार्डचे वाटप

येत्या १५ ऑगस्टपासून राज्यभरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी एनसी एमसी स्मार्ट कार्डच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेत जाऊन एसटीचे अधिकृत परवानाधारक प्रतिनिधी ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एनसीएमसी कार्डसाठी इतर कोणत्याही ठिकाणी नोंदणी करू नये, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.प्रवाशांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड अधिकृत एसटी आगार, बसस्थानक तसेच अधिकृत एजंट नेटवर्कच्या माध्यमातून मिळविता येणार असून, त्याच माध्यमातून कार्ड रिचार्जची सुविधाही उपलब्ध आहे.


 Give Feedback



 जाहिराती