सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश
  • पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत एक महिन्याआधी पतीचा दुर्दैवी अंत; आता वेदनाविवश झालेल्या पत्नीनंही स्वतःला संपवलं
  • एकनाथ शिंदेंना फक्त आमदारांच्या संख्येवर मुख्यमंत्री बनवण्यात आलं, त्यांनी कोणत्या आधारावर कार्यकारिणी जाहीर केली; ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद, निवडणूक आयोगाची चिरफाड
  • डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
  • 'अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय'; संजय राऊतांचा सनसनाटी दावा
 जिल्हा

मोठी बातमी : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला; आरोपीला अटक, फडणवीसांकडून चौकशीचे आदेश

डिजिटल पुणे    13-08-2026 18:15:08

नांदेड : शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमधील गुरुद्वारा परिसरात हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. तख्त श्री हजूर साहिब येथे दर्शनासाठी गेलेल्या बादल यांच्यावर हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. त्यामध्ये सुखबीर सिंह बादल यांना एका इमारतीच्या दिशेने नेण्यात येत असल्याचे दिसून येते. त्यांच्या उजव्या हाताला कापड बांधलेले असल्याचेही व्हिडिओत दिसत आहे. बादल हे पत्नी आणि खासदार हरसिमरत कौर बादल यांच्यासह तख्त श्री हजूर साहिब येथे आले होते.

हल्लेखोराला घटनास्थळावरूनच अटक

या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले आहे. जसपालसिंग असे आरोपीचे नाव असून तो ६२ वर्षांचा असल्याची माहिती आहे. तो मूळचा पुण्याचा असून पुणे न्यायालयात वकील म्हणून कार्यरत होता, अशी माहिती समोर आली आहे. मागील दोन वर्षांपासून तो नांदेडजवळील मुगट येथील मातासाहिब गुरुद्वारात सेवा करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

बादल गुरुद्वारातून दर्शन घेऊन बाहेर येत असताना जसपालसिंगने हल्ला केल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. आरोपीला घटनास्थळावरूनच अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू आहे. हल्ल्यामागील नेमका उद्देश काय होता, याचा तपास पोलीस करत आहेत.

मुख्यमंत्री फडणवीसांकडून पोलिसांकडून माहिती

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी नांदेडच्या पोलीस अधीक्षकांकडून घटनेची माहिती घेतली. तसेच सुखबीर सिंह बादल यांच्याशी फोनवरून संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

हल्लेखोराला तातडीने अटक करण्यात आली असून हल्ल्यामागील कारण आणि उद्देशाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलिसांना दिले आहेत. बादल यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.

‘घटनेची माहिती घेऊन कडक कारवाई करू’

राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. गुरुद्वारा परिसरात सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळाली असून घटनेची सविस्तर माहिती घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.

हल्ल्याची संपूर्ण चौकशी करून संबंधित व्यक्तीविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, अशी भूमिका गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी स्पष्ट केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे नांदेडमधील गुरुद्वारा परिसरातील सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दाही ऐरणीवर आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.


 Give Feedback



 जाहिराती