बीड : बीडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख शिवाजीराव शिंदे यांचा राहत्या घरी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. दादाहरी वडगाव येथील त्यांच्या निवासस्थानी ही घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला. त्यांच्या पार्थिवावर सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
शिवाजीराव शिंदे यांनी नेमक्या कोणत्या कारणातून हे टोकाचे पाऊल उचलले, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून तपास पूर्ण झाल्यानंतरच मृत्यूमागील कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे बीडसह राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
काही महिन्यांपूर्वी झाला होता जीवघेणा हल्ला
दरम्यान, मे २०२६ मध्ये परळी शहरातील त्यांच्या मालकीच्या हॉटेलमध्ये शिवाजीराव शिंदे यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. हॉटेलमध्ये आलेल्या एका युवकाने कोयत्याने त्यांच्यावर हल्ला केल्याचे त्यावेळी समोर आले होते.
हॉटेलमधील काही व्यक्तींनी संबंधित युवकाला पकडून ठेवल्याने शिंदे यांचा जीव थोडक्यात बचावला होता. या घटनेनंतर शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हल्ल्यामागे आपल्या मुलाशी संबंधित वाद असल्याचा संशय व्यक्त केला होता. तसेच हल्लेखोराने घरासमोर शिवीगाळ केल्याचे आणि हॉटेलमधील पैसे लुटल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
आता काही महिन्यांनंतर शिवाजीराव शिंदे यांचा मृत्यू झाल्याने या पूर्वीच्या हल्ल्याचा आणि सध्याच्या घटनेचा काही संबंध आहे का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या दोन्ही घटनांमध्ये संबंध असल्याचे अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही.शिवाजीराव शिंदे यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय, याचा उलगडा पोलिसांच्या तपासातून होणार आहे. त्यामुळे या प्रकरणातील पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.