मुंबई : अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईत गणरायाला निरोप देण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी जमली असताना प्रभादेवी परिसरात धक्कादायक प्रकार घडला. ‘केजी मार्गचा राजा’च्या विसर्जन मिरवणुकीत अचानक भरधाव होंडा सिटी कार घुसल्याने चार भाविक जखमी झाले. कारने गणपतीच्या ट्रॉलीला धडक देत मिरवणुकीतील भाविकांना धडक दिल्याने काही काळ परिसरात एकच गोंधळ उडाला.
प्रभादेवी येथील काकासाहेब गाडगीळ मार्ग आणि इंद्रा टॉवर परिसरातून ‘केजी मार्गचा राजा’ची विसर्जन मिरवणूक जात होती. यावेळी गर्दीतून अचानक एक होंडा सिटी कार आली आणि थेट मिरवणुकीत घुसली. कारची गणपतीच्या ट्रॉलीला धडक बसल्यानंतर चार भाविकांनाही धडक झाली.
या घटनेत चार जण जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी दोन जखमींवर केईएम रुग्णालयात, तर अन्य दोन जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, जखमींना किरकोळ दुखापत झाली आहे.
चालकाने मद्यप्राशन केले होते का? पोलिसांकडून तपास
कारचालकाने मद्यप्राशन केले होते का, याबाबत प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चालकाला वैद्यकीय तपासणीसाठी सायन रुग्णालयात पाठवले आहे. वैद्यकीय अहवालानंतर या बाबत अधिक स्पष्टता होणार आहे.
कारच्या धडकेनंतर जमाव संतप्त
कार मिरवणुकीत घुसल्यानंतर उपस्थित भाविकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. संतप्त जमावाने कारचे नुकसान केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
पोलिसांनी चालक प्रणव राकेश अग्रवाल (वय 21) याला ताब्यात घेतले असून कारही पोलिसांच्या ताब्यात आहे. जखमींचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू असून चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.
प्रभादेवीत पोलिसांचा बंदोबस्त
घटनेनंतर प्रभादेवी परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. भरधाव आणि निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा आरोप भाविकांकडून करण्यात आला असून संबंधित चालकावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.