सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! 2 ऑक्टोबरला देशभरात UPI बंद, गांधी जयंतीला व्यापाऱ्यांचा 'नो यूपीआय डे', फक्त कॅश स्वीकारणार
  • सीसीटीव्ही; 24 तास नजर! कमांड सेंटरमधून पुणे पोलिसांचा शहरावर 'वॉच'; तंत्रज्ञानाच्या जोरावर विसर्जन मिरवणूक राहणार सुरक्षित, पोलिस ॲक्शन मोडमध्ये
 DIGITAL PUNE NEWS

नेपाळमध्ये अस्मानी संकटाचा कहर; महाकाय डोंगर नदीत कोसळला, पूर-भूस्खलनाने 21 जणांचा मृत्यू

डिजिटल पुणे    29-09-2026 13:32:13

नेपाळ : नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनाचे संकट अधिकच गंभीर झाले आहे. मुस्तांग जिल्ह्यात पावसाच्या तडाख्यात महाकाय डोंगराचा काही भाग थेट कालीगंडकी नदीत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डोंगराचा मोठा भाग नदीत कोसळल्याने काही क्षणांतच नदीचा प्रवाह दगड, माती आणि चिखलाच्या ढिगाऱ्यांनी व्यापला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दरम्यान, नेपाळमधील विविध भागांमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे परिस्थिती गंभीर बनली असून, गेल्या 24 तासांत संबंधित घटनांमध्ये 21 जणांचा मृत्यू झाला आहे. चार जण बेपत्ता असून 26 जण जखमी झाले आहेत. राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माहितीनुसार, या कालावधीत पूर, भूस्खलन आणि अतिवृष्टीच्या तब्बल 272 घटना नोंदवण्यात आल्या आहेत.

भूस्खलनाच्या 97 घटना

गेल्या 24 तासांत भूस्खलनाच्या सर्वाधिक 97 घटना घडल्या. या घटनांमध्ये 19 जणांचा मृत्यू झाला, चार जण बेपत्ता आहेत, तर चार जण जखमी झाले आहेत. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर माती, दगड आणि चिखलाचे ढिगारे साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

चितवनमध्ये नद्या धोक्याच्या पातळीवर

चितवन जिल्ह्यात नारायणी आणि रिऊ या दोन्ही नद्या धोक्याच्या पातळीच्या वरून वाहत आहेत. देवघाट येथे नारायणी नदीची पाणीपातळी 9.23 मीटरवर पोहोचली असून, धोक्याची पातळी 9 मीटर आहे. तर रिऊ नदीची पाणीपातळी 3.92 मीटरवर पोहोचली आहे. या नदीची धोक्याची पातळी 3.8 मीटर आहे.

मुसळधार पावसामुळे चितवनमध्ये अनेक ठिकाणी भूस्खलन आणि चिखलाचे प्रवाह आल्याने रस्ते बंद झाले आहेत. कर्नाली प्रांतातील महामार्गांवरही भूस्खलनाचा परिणाम झाला असून वाहतूक विस्कळीत झाली आहे.

पुराच्या पाण्यात क्रूझ जहाज वाहून गेले

नारायण नदीच्या वाढत्या पाणीपातळीचा फटका नदीकिनारी उभ्या असलेल्या क्रूझ जहाजालाही बसला. पुराच्या पाण्याचा वेग वाढल्याने जहाजाला बांधलेले दोर तुटले आणि हे क्रूझ सुमारे 100 मीटरपर्यंत वाहून गेले. त्यानंतर ते पुलाच्या खांबाला धडकले.

नेपाळमध्ये सध्या मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाकडून संवेदनशील भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत असून, बचाव आणि मदतकार्य सुरू आहे


 Give Feedback



 जाहिराती