पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याला खंडणीच्या एका प्रकरणात विशेष मोक्का न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. घायवळसह या प्रकरणातील सर्व आरोपींची पुराव्याअभावी सुटका करण्यात आली. 2020 मध्ये घायवळ कारागृहात असताना एका व्यक्तीकडून खंडणी मागितल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता.
या प्रकरणात तक्रारदाराने न्यायालयीन सुनावणीदरम्यान आपल्या आधीच्या आरोपांपासून माघार घेतली. पोलिसांच्या दबावामुळे आपल्याकडून तक्रार नोंदवून घेण्यात आल्याचा दावा त्याने न्यायालयात केला. तसेच, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नोंदवलेल्या जबाबातही संबंधित घटना घडली नसल्याचे त्याने स्पष्ट केले.
तक्रारदारासह साक्षीदारही फिरले
खटल्याच्या सुनावणीदरम्यान इतर साक्षीदार आणि पंचांनीही सरकारी पक्षाच्या आरोपांना दुजोरा दिला नाही. त्यामुळे घायवळ आणि इतर आरोपींविरोधातील आरोप सिद्ध करण्यासाठी आवश्यक पुरावे न्यायालयासमोर ठोसपणे आले नाहीत. परिणामी विशेष मोक्का न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
कारागृहातून खंडणी मागितल्याचा होता आरोप
2020 मध्ये निलेश घायवळ कारागृहात असताना संतोष धुमाळ याच्यामार्फत फिर्यादीकडे भावाच्या रॅलीसाठी जीप देण्याच्या नावाखाली खंडणी मागण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. गुन्हे शाखेने तपास करत हे प्रकरण उघडकीस आणले होते. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेत तक्रारदार आणि अन्य साक्षीदारांनीच आरोप नाकारल्याने सरकारी पक्षाची बाजू कमकुवत झाली.
पोलिसांना चकवा देत परदेशात फरार
निलेश घायवळवर पुण्यातील गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे आरोप यापूर्वी झाले आहेत. पुण्यातील कोथरुड परिसरात झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणानंतर घायवळ टोळीविरोधात मोक्का कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, कारवाईचा सुगावा लागताच घायवळ पोलिसांना चकवा देत परदेशात गेल्याचे समोर आले होते.
घायवळविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली होती. पासपोर्टसाठी अर्ज करताना त्याने आडनावातील ‘घायवळ’ऐवजी ‘गायवळ’ असा उल्लेख केल्याचे तपासात समोर आल्याची माहिती आहे. त्यानंतर तो युरोपमध्ये गेल्याचे सांगण्यात आले.
पासपोर्ट जमा करण्याचे आदेश, तरीही परदेशवारी
2021 मध्ये पुण्यातील एका दरोड्याच्या प्रकरणात निलेश घायवळला अटक करण्यात आली होती आणि त्याच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. 2022 मध्ये त्याला न्यायालयाने जामीन मंजूर करताना पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्याचे आदेश दिले होते. मात्र, पासपोर्ट जमा न करता त्याच पासपोर्टच्या आधारे त्याने युरोपला प्रवास केल्याचे तपासात समोर आले होते.
सध्या निलेश घायवळ देशाबाहेर असल्याची माहिती आहे. दरम्यान, खंडणीच्या या प्रकरणात तक्रारदार आणि साक्षीदारांनी आरोपांना दुजोरा न दिल्याने न्यायालयाने पुराव्याअभावी घायवळसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.