सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! 2 ऑक्टोबरला देशभरात UPI बंद, गांधी जयंतीला व्यापाऱ्यांचा 'नो यूपीआय डे', फक्त कॅश स्वीकारणार
  • सीसीटीव्ही; 24 तास नजर! कमांड सेंटरमधून पुणे पोलिसांचा शहरावर 'वॉच'; तंत्रज्ञानाच्या जोरावर विसर्जन मिरवणूक राहणार सुरक्षित, पोलिस ॲक्शन मोडमध्ये
 क्राईम

नाशिकच्या गोदाघाटावर अघोरी कर्मकांडाचा धक्कादायक प्रकार; महिलेच्या डोळ्यात लिंबाचा रस, 1.60 लाखांची फसवणूक

डिजिटल पुणे    29-09-2026 17:31:13

धुळे : आजारपण आणि कौटुंबिक अडचणी दूर करण्याचे आमिष दाखवत धुळ्यातील एका कुटुंबाची अघोरी पूजा व जादूटोण्याच्या नावाखाली तब्बल 1 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. नाशिकच्या गोदाघाटावर पीडित महिलेला कथितपणे अघोरी स्नान घालण्यात आले. त्यानंतर तिच्या डोळ्यांत लिंबाचा रस पिळल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

फसवणुकीनंतर पीडित महिलेने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधला. समितीच्या कार्यकर्त्यांनी कुटुंबाला धीर देत पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर 27 सप्टेंबर 2026 रोजी धुळे शहर पोलिस ठाण्यात अघोरी प्रथा आणि जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणात मांत्रिक महिला सरिता जाधव आणि तिच्या काही साथीदारांवर कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे. पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.

21 वर्षीय मुलीला 40 दिवस माहेरी ठेवण्याचा आरोप

पीडित कुटुंबातील 21 वर्षीय मुलीवर दुर्धर आजाराचा प्रभाव असल्याचे सांगून तिला सुमारे 40 दिवस धुळ्यातील माहेरी ठेवण्यात आल्याचा आरोप आहे. संकट टाळण्यासाठी हा उपाय आवश्यक असल्याचे सांगून मुलीला कुटुंबापासून दूर ठेवण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.त्यानंतर 24 जुलै 2026 रोजी मुलीचा जबरदस्तीने साखरपुडा उरकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. पुढे संशयितांनी पीडित कुटुंबाशी संपर्क तोडल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

गोदाघाटावर नेऊन अघोरी स्नान?

दरम्यान, मांत्रिक महिलेने पीडित महिलेला नाशिकच्या गोदाघाटावर नेले. तेथे कथित अघोरी विधी करण्यात आल्याचा आरोप आहे. यावेळी महिलेच्या अंगावरून उतरवलेल्या लिंबाचा रस तिच्या डोळ्यांत पिळण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

अंधश्रद्धेच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या प्रकारांविरोधात महाराष्ट्रात कायदा असतानाही अशा घटना समोर येत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. या प्रकरणातील नेमका प्रकार, आर्थिक व्यवहार आणि आरोपींची भूमिका याबाबत धुळे शहर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


 Give Feedback



 जाहिराती