सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • रिलायन्स जिओची 6G कडे वाटचाल, नेटवर्कमध्ये सॉफ्टवेअर अपग्रेडवर भर देणार, आकाश अंबानी यांनी जिओचं मिशन मांडलं
  • इम्रान खानच्या अडचणी वाढल्या! 28 ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस; सीजेपी आंदोलनात सहभागी झाल्याने कारवाई
  • पुणेकरांनो, पाणी जपून वापरा! आजपासून दर गुरुवारी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा बंद; ऑगस्ट 2027 पर्यंत महापालिकेचे नियोजन
 शहर

पुणे विद्यापीठातील गर्ल्स हॉस्टेलमध्ये गैरवर्तनाचा आरोप; ३०० हून अधिक विद्यार्थिनींचे आंदोलन, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

डिजिटल पुणे    13-10-2026 11:47:35

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृह परिसरात एका विद्यार्थिनीला अडवून तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप समोर आला आहे. या घटनेनंतर विद्यापीठातील सुरक्षा व्यवस्थेबाबत विद्यार्थिनींनी संताप व्यक्त केला असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाची दखल घेत विद्यापीठ प्रशासनाने दोन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक विभाग आणि वसतिगृहातील प्रवेश निलंबित केले आहेत.

मध्यरात्री विद्यार्थिनींचे आंदोलन; पोलिस ठाण्यात धाव

रविवारी रात्री मुलींच्या वसतिगृह परिसरात दोन विद्यार्थ्यांनी एका विद्यार्थिनीला अडवून तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर विद्यार्थिनींनी वसतिगृह परिसरात आंदोलन केले. रात्री साडेदहा वाजल्यानंतर काही मुले मुलींच्या वसतिगृहाच्या आवारात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या घटनेच्या निषेधार्थ ३०० हून अधिक विद्यार्थिनी मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास चतुःशृंगी पोलिस ठाण्यात पोहोचल्या. शिक्षण विभागातील प्रमोद राठोड, ओमकार थोरे आणि विजय कांबळे या तीन विद्यार्थ्यांविरोधात तक्रार करण्यात आल्याचे समोर आले आहे. संबंधित प्रकरणात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे आणि प्रकाशव्यवस्था वाढवण्याची मागणी

वसतिगृह परिसरातील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत विद्यार्थिनींनी प्रशासनाला जाब विचारला आहे. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, पुरेशी प्रकाशव्यवस्था करावी आणि सुरक्षा यंत्रणा अधिक प्रभावी करावी, अशी मागणी विद्यार्थिनींकडून करण्यात आली आहे.तसेच, सुरक्षा रक्षक आणि वॉर्डन यांच्या कार्यपद्धतीवरही विद्यार्थिनींनी प्रश्न उपस्थित केले. वसतिगृहातील विद्यार्थिनींच्या समस्या जाणून घेण्यासाठी संबंधित अधिकारी नियमितपणे उपलब्ध होत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

मुला-मुलींसाठी वेगवेगळे नियम असल्याचा आरोप

वसतिगृहातील नियमांमध्ये मुली आणि मुलांसाठी वेगवेगळे निकष लावले जात असल्याबद्दल विद्यार्थिनींनी नाराजी व्यक्त केली आहे. मुलींना रात्री ठरलेल्या वेळेपेक्षा अवघ्या दहा मिनिटांचा उशीर झाला तरी पालकांना फोन करण्यास सांगितले जाते आणि उशिराचे कारण विचारले जाते, असे त्यांचे म्हणणे आहे.

दुसरीकडे, मुलांना रात्री उशिरापर्यंत बाहेर राहण्याची मुभा दिली जात असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे. त्यामुळे वसतिगृहाचे नियम सर्वांसाठी समान असावेत आणि मुलांच्या वावरासाठीही वेळेची मर्यादा निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

वसतिगृहप्रमुखांचा राजीनामा; उच्चस्तरीय चौकशी होणार

या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर वसतिगृहप्रमुख प्रा. सोनिया नगराळे यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी शिक्षणशास्त्र व विस्तार विभागाच्या प्रमुख डॉ. गीता शिंदे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

दरम्यान, कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांची भेट घेऊन विद्यार्थिनींनी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

विद्यापीठाच्या वसतिगृह परिसरात विद्यार्थिनींच्या सुरक्षेची खात्री करणे, तक्रारींची तातडीने दखल घेणे आणि सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी दूर करणे, ही प्रमुख आव्हाने आता प्रशासनासमोर आहेत. त्यामुळे चौकशीचा निष्कर्ष आणि त्यानंतर होणाऱ्या कारवाईकडे विद्यार्थिनींसह विद्यापीठातील सर्वांचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती