सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • उद्याच्या आंदोलनात एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
 विश्लेषण

अर्णब चक्रीवादळाचा आंध्र प्रदेशला मोठा तडाखा! काकीनाड्यात झाडे उन्मळली, वीजवाहिन्या तुटल्या; किनारपट्टीवर पूरस्थितीचा धोका

डिजिटल पुणे    28-10-2026 11:54:35

आंध्र प्रदेश : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘अर्णब’ चक्रीवादळाने आंध्र प्रदेशातील किनारपट्टी भागात मोठा प्रभाव दाखवण्यास सुरुवात केली आहे. काकीनाडा परिसरात चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून वीजवाहिन्यांचेही नुकसान झाले आहे. मुसळधार पाऊस, वेगवान वारे आणि समुद्राला आलेल्या उधाणामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उत्तर चेन्नईमध्ये समुद्राचे पाणी रस्त्यांवर

अर्णब चक्रीवादळाचा परिणाम उत्तर चेन्नईच्या किनारपट्टीवरही जाणवू लागला आहे. समुद्राच्या पाण्याने किनारी रस्त्यांवर शिरकाव केल्याने अनेक भाग जलमय झाले आहेत. समुद्राच्या जोरदार लाटा थेट रस्त्यांवर आदळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून वाहनचालक आणि पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

काकीनाड, विशाखापट्टणममध्ये जोरदार वाऱ्यांचा तडाखा

आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथे चक्रीवादळामुळे झाडे कोसळली असून अनेक ठिकाणी वीजवाहिन्या तुटल्या आहेत. काही रस्त्यांवर अद्याप पाणी साचलेले आहे. पडलेली झाडे हटवण्यासाठी अग्निशमन दल आणि बचाव पथके कार्यरत आहेत. बाधित भागांमध्ये मदतकार्य सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

विशाखापट्टणम येथील आर. के. बीच परिसरातही वाऱ्यांचा वेग वाढला असून समुद्रात उंच लाटा उसळत आहेत. पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील दिघा समुद्रकिनाऱ्यावरही समुद्र खवळलेला आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील नागरिक आणि पर्यटकांना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ताशी १२५ किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता

हवामान विभागाच्या माहितीनुसार, चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आंध्र प्रदेशातील किनारपट्टी भागात वाऱ्यांचा वेग ताशी ११५ ते १२५ किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी वाऱ्यांचा वेग ताशी १४० किलोमीटरपर्यंत वाढू शकतो. कोनासीमा, काकीनाडा आणि यानम परिसराला या वादळाचा मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

चक्रीवादळाच्या केंद्राजवळील भागात पुढील काही तास हवामान अधिक प्रतिकूल राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यक त्या ठिकाणी बचाव आणि मदतकार्याची तयारी करण्यात आली आहे.

आंध्र प्रदेशातील पाच जिल्ह्यांना अचानक पुराचा इशारा

भारतीय हवामान विभागाने अनाकापल्ली, अल्लुरी सीताराम राजू, काकीनाडा, विशाखापट्टणम आणि विजयनगरम या जिल्ह्यांतील काही भागांना अचानक पूर येण्याचा मध्यम ते गंभीर धोका असल्याचा इशारा दिला आहे. पुढील सहा तासांत काही भागांत पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून, पुढील २४ ते ३६ तासांत अनेक ठिकाणी पुराचा धोका कायम राहू शकतो.

आतापर्यंतच्या पावसाच्या नोंदीनुसार, विशाखापट्टणम येथे २१७ मिमी, कलिंगपट्टणम येथे १४७ मिमी, तुनी येथे १२३ मिमी, काकीनाडा येथे ११८ मिमी, मछलीपट्टणम येथे ११५ मिमी, गोपालपूर येथे ९४ मिमी आणि ओडिशातील पुरी येथे ७२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

विमान आणि रेल्वे सेवांवरही परिणाम

 

चक्रीवादळामुळे विमान वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. विशाखापट्टणम आणि विजयवाडा येथून येणाऱ्या-जाणाऱ्या विमानांच्या वेळापत्रकात बदल होऊ शकतो, असा इशारा एअर इंडियाने दिला आहे. २७ ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या प्रवासी सूचनेनुसार, प्रवाशांनी विमानाचे अद्ययावत वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर तपासावे आणि विमानतळावर पोहोचण्यासाठी अतिरिक्त वेळ राखून ठेवावा.

याशिवाय, रेल्वे सेवांवरही परिणाम झाल्याचे वृत्त आहे. उपलब्ध माहितीनुसार, १०० हून अधिक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या असून चार विमानतळांवरील कामकाजावर परिणाम झाला आहे. काही विमानांची उड्डाणेही रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा

अर्णब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, पुद्दुचेरी, तेलंगणा, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि ईशान्य महाराष्ट्रासह विविध भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच दिल्ली, हरियाणा आणि ईशान्य भारतातील आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम व त्रिपुरा येथेही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

चक्रीवादळामुळे अनेक जिल्ह्यांतील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा घेतला जात असून, नागरिकांनी हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

 


 Give Feedback



 जाहिराती