सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • उद्याच्या आंदोलनात एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
 क्राईम

पार्टीत अंगावर गरम रस्सा सांडल्याने तरुणाचा मृत्यू; उशिरा माहिती दिल्याचा जाब विचारताच मित्रांकडून कुटुंबीयांना मारहाण

डिजिटल पुणे    28-10-2026 13:44:12

कोल्हापूर : मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या अंगावर उकळता रस्सा सांडल्याने तो गंभीररीत्या भाजला. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. मात्र, घटनेची माहिती कुटुंबीयांना उशिरा दिल्याने त्यांनी तरुणाच्या मित्रांकडे जाब विचारला. यावरून झालेल्या वादात मित्रांनी मृत तरुणाच्या कुटुंबीयांना मारहाण केल्याची घटना कोल्हापुरातील दसरा चौक परिसरात घडली. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनील माने (रा. लक्ष्मीपुरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील हे मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी आंबेवाडी परिसरात गेले होते. तेथे जेवण तयार करत असताना उकळता रस्सा त्यांच्या अंगावर सांडला. त्यामुळे ते गंभीररीत्या भाजले. त्यानंतर मित्रांनी त्यांना उपचारासाठी दसरा चौकातील रुग्णालयात दाखल केले.

ही घटना दुपारी तीनच्या सुमारास घडली होती. मात्र, सुनील यांच्या कुटुंबीयांना याची माहिती रात्री देण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी मित्रांना उशिरा माहिती देण्याचे कारण विचारले. याच मुद्द्यावरून वाद वाढला आणि सुनील यांचे भाऊ रवींद्र माने, भावजय शर्मिला माने आणि पुतण्या शुभेंदू यांना मारहाण करण्यात आली.

या घटनेत शर्मिला माने यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले असून, रवींद्र माने आणि शुभेंदू हेही जखमी झाले आहेत. याप्रकरणी अक्षय अरुण गेजगे (रा. गजानन महाराजनगर, संभाजीनगर), रवी प्रकाश कुरणे आणि साहील मुबारक शेख (दोघेही रा. लक्ष्मीपुरी) यांच्याविरोधात लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


 Give Feedback



 जाहिराती