सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं सावट; 'मुरासू' चक्रीवादळामुळे कोकण, मराठवाडा अन् मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्याची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट
  • दिया मिर्झाला ट्रोल करणाऱ्या वाचाळ राजकारण्यांना मुंबई हायकोर्टानं झाडलं, डिलीट केलेला व्हिडीओ पुन्हा पोस्ट करण्याचे आदेश
 DIGITAL PUNE NEWS

मोठी बातमी! प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात चौकशीनंतर मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा; एकनाथ शिंदेंना पत्र लिहून मांडली भूमिका

डिजिटल पुणे    29-10-2026 16:52:47

ठाणे : ठाकरेंच्या शिवसेनेचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मीनाक्षी शिंदे यांनी ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला. या प्रकरणात मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर मीनाक्षी शिंदे यांनी हा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाला असून, या प्रकरणात मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पूर्णेकर कुटुंबीयांकडून केली जात आहे. दोघांचीही या प्रकरणाच्या अनुषंगाने चौकशी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर मीनाक्षी शिंदे यांनी स्वतःहून राजीनामा दिला आहे. मात्र, त्यांच्या राजीनाम्याचा या प्रकरणातील चौकशीशी नेमका काय संबंध आहे, याबाबत अधिकृतपणे स्पष्टता समोर आलेली नाही.

एकनाथ शिंदेंना पत्र लिहून मांडली भूमिका

मीनाक्षी शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर आणि पक्षांतर्गत पातळीवर आपल्याविषयी आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच विविध पक्षांकडून एकत्रितपणे आरोप करून पक्ष नेतृत्वावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना त्यांनी पत्रातून व्यक्त केली.

आपण आजवर पक्षाचे काम पूर्ण निष्ठेने केले असून, पक्षाची किंवा नेतृत्वाची मान खाली जाईल असे कोणतेही कृत्य केलेले नाही, असे मीनाक्षी शिंदे यांनी नमूद केले. ज्या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचे त्या सांगतात, त्यामध्ये आपले नाव जोडले जात असल्यामुळे पक्षावर आणि नेतृत्वावर दबाव निर्माण होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

'नेतृत्वाची प्रतिष्ठा जपण्यासाठी राजीनामा'

आपल्या पत्रात मीनाक्षी शिंदे यांनी नेतृत्वाचा सन्मान आणि पक्षाची प्रतिष्ठा जपणे आपल्यासाठी महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. आपल्यामुळे पक्ष नेतृत्वाची बदनामी होऊ नये, अशी भूमिका मांडत त्यांनी ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख पदाचा राजीनामा दिला.हा निर्णय नाराजीतून घेतलेला नसून, नेतृत्वाचा सन्मान राखण्यासाठी घेतल्याचेही त्यांनी पत्रात स्पष्ट केले. आपल्या भावनांची दखल घेतली जाईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

पक्षाकडून कारवाई नाही; मीनाक्षी शिंदेंचा स्वतःहून निर्णय

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मीनाक्षी शिंदे यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याचे समोर आले आहे. त्यांनी स्वतःहून पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्यानंतर त्या ठाणे महापालिकेतील नगरसेवक म्हणून कार्यरत राहणार असून, त्यांच्याकडे पक्षाच्या 'लाडकी सून अभियानाशी' संबंधित पदही आहे.

मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे हे मानपाडा विभागाचे विभागप्रमुख आहेत. प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांकडून सातत्याने कारवाईची मागणी केली जात असताना मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामा दिल्याने या घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणातील पुढील तपासात काय निष्पन्न होते आणि या प्रकरणात पुढे कोणती कारवाई होते, याकडे आता राजकीय वर्तुळासह ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती