सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं सावट; 'मुरासू' चक्रीवादळामुळे कोकण, मराठवाडा अन् मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्याची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट
  • दिया मिर्झाला ट्रोल करणाऱ्या वाचाळ राजकारण्यांना मुंबई हायकोर्टानं झाडलं, डिलीट केलेला व्हिडीओ पुन्हा पोस्ट करण्याचे आदेश
 क्राईम

मित्राची कार घेऊन घराबाहेर पडला, फोनही बंद झाला; सारसबागेजवळ बंद कारमध्ये आढळलेल्या तरुणाच्या मृत्यूचे गूढ उकलले!

डिजिटल पुणे    30-10-2026 17:30:57

पुणे : पुण्यातील सारसबाग परिसरात बंद कारमध्ये एका २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. शुभम बनसोडे असे मृत तरुणाचे नाव असून, तो गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होता. मित्राची कार घेऊन घरातून बाहेर पडल्यानंतर त्याचा मोबाईल बंद झाला होता. अखेर स्वारगेट परिसरातील जैन मंदिराजवळ उभ्या असलेल्या कारमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला.

मिळालेल्या माहितीनुसार, शुभम बनसोडे हा सोमवारी आपल्या मित्राकडून कार घेऊन घराबाहेर पडला होता. रात्री त्याने मित्राकडे कार मागितली होती. मात्र, आपण नेमके कुठे जात आहोत, याबाबत त्याने कोणतीही माहिती दिली नव्हती. घरातून बाहेर पडल्यानंतर त्याचा मोबाईल बंद येऊ लागल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. त्यानंतर कुटुंबीयांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केली होती.

दरम्यान, स्वारगेटमधील जैन मंदिराजवळ गेल्या दोन ते तीन दिवसांपासून एक मारुती कार उभी होती. कारच्या काचा काळ्या असल्याने आतमध्ये काय आहे, हे बाहेरून दिसत नव्हते. गुरुवारी सकाळी या कारमधून तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारची तपासणी केली असता, आतमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आला.

पोलिसांनी कारमधील मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. सुरुवातीला मृत तरुणाची ओळख पटलेली नव्हती. मात्र, बेपत्ता शुभम बनसोडे याच्या कुटुंबीयांनी ओळख पटवल्यानंतर मृतदेह शुभमचाच असल्याचे स्पष्ट झाले.

मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

शुभमचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. हा आत्महत्येचा प्रकार आहे की त्यामागे घातपाताचा संशय आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

ही कार नेमकी कोणी आणि कधी आणून त्या ठिकाणी उभी केली, याचाही पोलीस शोध घेत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून खडक पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


 Give Feedback



 जाहिराती