पुणे : दिवाळीच्या सणासाठी बाजारपेठेत मिठाई आणि फराळाची मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू असतानाच पुण्यात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. कोंढवा परिसरातील गायत्री लाडू भांडारच्या उत्पादन केंद्रावर छापा टाकत प्रशासनाने तब्बल 1,190 किलो लाडू आणि इतर खाद्यपदार्थ जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या मालाची एकूण किंमत 1 लाख 73 हजार 950 रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.
लाडू आणि बुंदीमध्ये अतिरिक्त खाद्यरंग
FDA ला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. उत्पादन केंद्राची तपासणी केली असता लाडू आणि बुंदी तयार करताना निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक खाद्यरंग वापरल्याचे आढळून आले. याशिवाय उत्पादन केंद्रातील स्वच्छतेबाबतही गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या.
या कारवाईदरम्यान प्रशासनाने लाडू आणि बुंदीचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेतील तपासणीसाठी पाठवले आहेत. तसेच एकूण 1,190 किलो खाद्यपदार्थ ताब्यात घेण्यात आले आहेत. या मालाचे बाजारमूल्य 1 लाख 73 हजार 950 रुपये असल्याचे FDA अधिकारी बालाजी शिंदे यांनी सांगितले. नमुन्यांच्या तपासणी अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
तुकाराम मुंढे यांच्या सूचनांनंतर FDA ची तपासणी मोहीम
दिवाळीच्या काळात मिठाई आणि फराळाच्या पदार्थांची मागणी वाढते. या पार्श्वभूमीवर खाद्यपदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या रंगाच्या प्रमाणावर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश तुकाराम मुंढे यांनी दिले होते. अन्नपदार्थांमध्ये वापरला जाणारा रंग अन्नसुरक्षा नियमांनुसार आणि निर्धारित मर्यादेतच असणे बंधनकारक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले होते.
सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
दिवाळीच्या निमित्ताने मिठाई खरेदी करताना नागरिकांनीही सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. खाद्यपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षितता याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कोंढव्यातील या कारवाईमुळे मिठाई उत्पादक आणि विक्रेत्यांनी अन्नसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.