मुंबई : मुंबईतील कल्याण रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांच्या दादागिरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परफ्युम खरेदी करण्यास नकार दिल्याच्या कारणावरून फेरीवाल्यांनी एका युवक आणि तरुणीला भररस्त्यात मारहाण केल्याची घटना घडली आहे. इतकेच नव्हे, तर तरुणीचा टी-शर्ट फाडून तिला अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. अशातच कल्याण रेल्वे स्थानक परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन मित्र-मैत्रीण परफ्युम खरेदीसाठी गेले असताना त्यांनी खरेदी करण्यास नकार दिला. याच कारणावरून संबंधित फेरीवाल्यांनी दोघांशी वाद घालत त्यांना मारहाण केली. यावेळी तरुणीच्या कपड्यांचीही विटंबना करण्यात आली आणि तिच्याशी अश्लील भाषेत गैरवर्तन करण्यात आले.
या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणात पुढाकार घेतल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत संबंधित दोन आरोपींना अटक केली आहे.दरम्यान, रेल्वे स्थानक परिसरात अशा प्रकारे फेरीवाल्यांकडून ग्राहकांना त्रास दिला जात असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. केवळ खरेदी करण्यास नकार दिल्यामुळे मारहाण आणि महिलेशी गैरवर्तन होण्याचा प्रकार गंभीर मानला जात आहे. सणासुदीच्या काळात गर्दीच्या ठिकाणी नागरिक, विशेषतः महिला आणि तरुणींच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी अधिक कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.