सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • दिवाळीच्या फटाक्यांना ब्रेक! मुंबई आणि ठाण्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास कारवाई
  • पुण्यात दिवाळीत आगींचा भडका! लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तब्बल ९४ ठिकाणी अग्नितांडव; सहा वर्षांतील सर्वाधिक घटना
  • कुठे फटाक्यांमुळे तर कुठे शॉर्ट सर्किट... दिवाळीला राज्यात भीषण अग्नितांडव; मुंबई, ठाण्यापासून ते नागपूर चंद्रपुरपर्यंत असंख्य आगीच्या घटना, मोठी वित्तहानी
  • सतेज पाटलांच्या एका हाकेवर गोकुळसाठी हजारोंची गर्दी जमली, कोल्हापूरच्या दसरा चौकात मुंगी शिरायलाही जागा उरली नाही!
 शहर

पुण्यात दिवाळीत आगींचा भडका! लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तब्बल ९४ ठिकाणी अग्नितांडव; सहा वर्षांतील सर्वाधिक घटना

डिजिटल पुणे    09-11-2026 16:45:16

पुणे : दिवाळीचा सण उत्साहात साजरा करताना फटाक्यांच्या आतषबाजीचा अतिरेक आणि निष्काळजीपणा पुणेकरांच्या चांगलाच अंगलट आल्याचे चित्र समोर आले आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुणे शहरात आगीच्या घटनांनी चिंताजनक पातळी गाठली. पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात अवघ्या काही तासांत तब्बल ९४ आगींच्या घटनांची नोंद झाली. गेल्या सहा वर्षांतील ही सर्वाधिक संख्या असल्याने शहराच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दुपारी ३ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत आगीच्या ९४ घटनांची नोंद करण्यात आली. फटाक्यांचा वाढता वापर आणि सुरक्षिततेच्या नियमांकडे केलेले दुर्लक्ष यामुळे आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत आगीच्या घटनांमध्ये ११९ टक्क्यांची वाढ

गेल्या काही वर्षांतील आकडेवारी पाहता यंदाची परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे स्पष्ट होते. २०२१ मध्ये २१, २०२२ मध्ये १९, २०२३ मध्ये ३५, २०२४ मध्ये ६० आणि २०२५ मध्ये ४३ आगींच्या घटना नोंदविण्यात आल्या होत्या. मात्र, यंदा हा आकडा थेट ९४ वर पोहोचला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत आगीच्या घटनांमध्ये तब्बल ११९ टक्क्यांची वाढ झाली असून, २०२४ मधील ६० घटनांचा विक्रमही यंदा मोडीत निघाला आहे.

दुकान, गोदाम आणि सदनिकांना आगीचा फटका

शहरात सातारा रस्त्यावरील एका प्रिंटिंग दुकानाला, मंगळवार पेठेतील गोदामाला तसेच रेंज हिल्स परिसरातील सदनिकेला आग लागण्याच्या प्रमुख घटना घडल्या. फटाक्यांमधून उडणाऱ्या ठिणग्या, मोकळ्या जागेतील सुकलेले गवत, कचरा तसेच बाल्कनी आणि टेरेसवर ठेवलेल्या ज्वलनशील वस्तूंमुळे आग लागण्याची शक्यता अधिक असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.

फटाके फोडताना योग्य खबरदारी न घेतल्यास निवासी इमारती, व्यावसायिक आस्थापना आणि गोदामांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी फटाके फोडताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

फटाक्यांच्या धुरामुळे हवेच्या गुणवत्तेवरही परिणाम

आगीच्या घटनांबरोबरच दिवाळीतील फटाक्यांमुळे होणारे वायुप्रदूषणही चिंतेचा विषय ठरत आहे. फटाक्यांच्या धुरातून बाहेर पडणारे सूक्ष्म धूलिकण हवेची गुणवत्ता खालावण्यास कारणीभूत ठरतात. शहरातील वाहतुकीचा धूर, बांधकामांमधून निर्माण होणारी धूळ आणि वाढते शहरी प्रदूषण यामध्ये फटाक्यांच्या धुराची भर पडत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

सुदैवाने जीवितहानी टळली

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आणि रात्री शहरातील विविध भागांत आगीच्या घटना घडल्या असल्या, तरी अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे समोर आलेले नाही.

मात्र, एकाच दिवशी ९४ ठिकाणी आग लागण्याच्या घटनांनी पुणे शहरातील अग्निसुरक्षा आणि फटाक्यांच्या वापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. सणाचा आनंद साजरा करताना नागरिकांनी सुरक्षिततेला प्राधान्य देणे किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव या घटनांमधून पुन्हा एकदा झाली आहे.


 News Feedback

Digital Pune
Harakchand Jain
 10-11-2026 09:03:32

कोर्टाने आदेश देउनही सरकारने अंमलबझावणीत अशम्य कसूर केल्यामूले आगीत निर्दोष नागरिकाचा आतोनात नूकसान झाले पोलीस मनपा व सरकारला आरोपीच्या पिंजर्यात आणून नूकसान झालेल्यानी सामूहिक अथवा व्यक्तीगत जनहित याचीका भरपाइ साठी दाखल करावी

 Give Feedback



 जाहिराती