सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राज्यात आज रिक्षांचा संप; मुंबई, पुणे, नाशिकसह अनेक शहरांतील प्रवाशांना फटका बसण्याची शक्यता
  • मोठी बातमी: बिस्लेरी कंपनीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत ठरणारा घटक, FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी
 DIGITAL PUNE NEWS

पालघरमध्ये भाजपची ताकद वाढली! शिंदे गटाचे माजी आमदार श्रीनिवास वनगा यांची घरवापसी; राष्ट्रवादीच्या हबीब शेखांचाही भाजपमध्ये प्रवेश

डिजिटल पुणे    19-11-2026 14:07:23

पालघर : पालघर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार श्रीनिवास वनगा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षाचे कमळ हाती घेतले. विशेष म्हणजे, जव्हारमधील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख समर्थक हबीब शेख यांच्यासह अनेक सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे पालघरमध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

भाजपच्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पालघर दौऱ्यावर आले होते. याच कार्यक्रमादरम्यान श्रीनिवास वनगा आणि हबीब शेख यांचा पक्षप्रवेश पार पडला. दोन्ही पक्षांतील स्थानिक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.

उमेदवारी नाकारल्याने शिंदे गटावर नाराज; अखेर भाजपमध्ये प्रवेश

श्रीनिवास वनगा हे पालघर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार असून, त्यांचे वडील चिंतामण वनगा हे भाजपचे दिवंगत खासदार होते. वडिलांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने श्रीनिवास वनगा नाराज झाले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली आणि ते आमदार म्हणून निवडून आले. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. मात्र, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाकडून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. यामुळे वनगा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी त्यांनी पक्षनेतृत्वावर अन्याय केल्याचा आरोपही केला होता.उमेदवारी नाकारल्यानंतर काही काळ ते राजकीय घडामोडींपासून दूर होते. मात्र, आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत पुन्हा सक्रिय राजकारणात येण्याचा निर्णय घेतला आहे.

'माझा पिंड भाजपचा, ही माझी घरवापसी'; वनगांची प्रतिक्रिया

भाजप प्रवेशानंतर श्रीनिवास वनगा यांनी आपल्या निर्णयामागील भूमिका स्पष्ट केली. कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांची इच्छा असल्यामुळे आपण भाजपमध्ये परतण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले."राजकीय घडामोडींमुळे मी भरकटलो होतो. माझा पिंड भाजपचा आहे, त्यामुळे मी पुन्हा भाजपमध्ये आलो आहे. ही माझी घरवापसी आहे. माझ्या या निर्णयामुळे माझे दिवंगत वडील आणि भाजपचे माजी खासदार चिंतामण वनगा यांनाही आनंद झाला असता," अशी भावना श्रीनिवास वनगा यांनी पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात व्यक्त केली.

जव्हारमध्ये राष्ट्रवादीला धक्का; हबीब शेख भाजपच्या गोटात

श्रीनिवास वनगा यांच्या प्रवेशासोबतच जव्हार परिसरातही भाजपने राजकीय ताकद वाढवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे समर्थक असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य आणि अर्बन बँकेचे संचालक हबीब शेख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत अनेक ग्रामपंचायतींचे सरपंच आणि सदस्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

या पक्षांतरामुळे जव्हारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. माजी आमदार सुनील भुसारा यांच्या नेतृत्वालाही या घडामोडीमुळे आव्हान निर्माण झाले आहे. भुसारा यांच्याशी असलेल्या मतभेदांमुळे हबीब शेख यांनी राष्ट्रवादीची साथ सोडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

महायुतीत असूनही स्थानिक राजकारणात नवी समीकरणे?

पालघर जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गट हे महायुतीचे घटक पक्ष आहेत. असे असताना शिंदे गटाच्या माजी आमदाराने भाजपमध्ये प्रवेश केल्याने स्थानिक राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. वनगा यांच्या भाजप प्रवेशाचा शिंदे गटाच्या संघटनात्मक ताकदीवर काय परिणाम होणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

दुसरीकडे, हबीब शेख यांच्या प्रवेशामुळे जव्हारमधील राष्ट्रवादीच्या राजकीय गणितांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी हे पक्षप्रवेश महत्त्वाचे मानले जात आहेत.

एकीकडे शिंदे गटाचे माजी आमदार भाजपमध्ये दाखल झाले आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यात भाजपचे राजकीय बळ वाढणार की महायुतीमधील स्थानिक नेतृत्वात संघर्ष निर्माण होणार, हे आगामी काळात स्पष्ट होईल.

 

 


 Give Feedback



 जाहिराती