सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: बिस्लेरी कंपनीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत ठरणारा घटक, FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी
 शहर

सिंहगड कॉलेज रस्त्यावर जलवाहिनी फुटून पाण्याचे उंच फवारे; लाखो लिटर पाणी वाया, वाहनांचेही नुकसान! पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; जलवाहिनीच्या कामाच्या गुणवत्तेवर संशय

गजानन मेनकुदळे    23-11-2026 10:46:33

पुणे : पुणे शहरात पावसाची कमतरता आणि संभाव्य पाणीटंचाईची चिंता व्यक्त होत असताना दुसरीकडे महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीतून लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आंबेगाव बुद्रुक परिसरातील सिंहगड कॉलेज रस्त्यावर रविवारी दुपारी महापालिकेची १,४०० मिलीमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी फुटल्याने पाण्याचे तब्बल ५० फूट उंचीपर्यंत फवारे उडाले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले, तर पाण्याच्या प्रचंड दाबासोबत उडालेल्या दगडांमुळे अनेक वाहनांच्या काचांचे नुकसान झाले.

रविवारी दुपारी साधारण दोन वाजण्याच्या सुमारास सिंहगड कॉलेज रस्त्यावरील शिवसृष्टी परिसरात जमिनीतून अचानक मोठा आवाज झाला. त्यानंतर काही क्षणांतच जमिनीतून पाण्याचे मोठमोठे फवारे उडू लागले. पाण्याचा दाब इतका प्रचंड होता की, पाण्याचे कारंजे सुमारे ५० फूट उंचीपर्यंत पोहोचले. रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक, वाहनचालक आणि परिसरातील दुकानदार या अनपेक्षित प्रकारामुळे घाबरून गेले. पाण्यासोबत उडालेल्या दगडांचा फटका काही नागरिकांना बसला, तर रस्त्यालगत उभ्या असलेल्या कारसह इतर वाहनांच्या काचा फुटल्या. परिसरातील काही साहित्याचेही नुकसान झाले.

घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या संबंधित विभागाने तातडीने हालचाली सुरू केल्या. अवघ्या सहा मिनिटांत, म्हणजेच दुपारी २ वाजून ६ मिनिटांनी जलवाहिनीतून पाणी पंप करणे बंद करण्यात आले. मात्र, तोपर्यंत मोठ्या प्रमाणावर पाणी रस्त्यावर वाहून गेले होते. शहरात उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईचे सावट असताना अशा प्रकारे लाखो लिटर पाणी वाया जाणे ही चिंतेची बाब ठरत आहे.

विशेष म्हणजे, वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातून महंमदवाडी परिसराला पाणीपुरवठा करणारी सुमारे २३ किलोमीटर लांबीची ही जलवाहिनी आहे. समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या या जलवाहिनीला सुमारे तीन हजार वेल्डिंगचे जोड असल्याची माहिती आहे. या जलवाहिनीची हायड्रॉलिक चाचणी करण्यात आल्यानंतरही ती फुटल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत आणि तपासणी प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

एकीकडे पाण्याची बचत करण्याचे आवाहन, तर दुसरीकडे लाखो लिटर पाणी वाया!

पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने आगामी काळात शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असताना महापालिकेच्या कोट्यवधी रुपयांच्या जलवाहिनी प्रकल्पात वारंवार अशा घटना घडत असतील, तर या कामांच्या दर्जाची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. जलवाहिनी फुटण्यामागचे नेमके कारण काय, संबंधित कामाची गुणवत्ता तपासण्यात काही त्रुटी राहिल्या आहेत का आणि झालेल्या नुकसानीची जबाबदारी कोण निश्चित करणार, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

पाणीटंचाईच्या काळात पाण्याचा अपव्यय रोखण्याची जबाबदारी नागरिकांइतकीच प्रशासनाचीही आहे. त्यामुळे या घटनेची केवळ दुरुस्ती करून बोळवण न करता जलवाहिनीच्या कामाची तांत्रिक तपासणी करून भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.


 Give Feedback



 जाहिराती