नवी दिल्ली : देशातील लोकप्रिय बाटलीबंद पाणी उत्पादक कंपनी बिसलेरीच्या पाण्याबाबत गंभीर बाब समोर आली आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) कंपनीच्या पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरचा नमुना तपासणीत असुरक्षित आढळल्यानंतर बिसलेरी इंटरनॅशनलविरोधात न्यायालयीन खटला चालवण्यास मंजुरी दिली आहे. पाण्याच्या नमुन्यात निर्धारित मानकांशी विसंगत रासायनिक घटक आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. FSSAI ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत यासंदर्भातील माहिती दिली.
दोन प्रयोगशाळांच्या तपासणीत नमुना असुरक्षित
FSSAI कडून बिसलेरीच्या पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरचा नमुना तपासणीसाठी घेण्यात आला होता. प्राथमिक तपासणीत या नमुन्यात ब्रोमेट या रासायनिक घटकाचे प्रमाण निर्धारित मर्यादेनुसार नसल्याचे आढळले. त्यामुळे संबंधित पाण्याचा नमुना असुरक्षित घोषित करण्यात आला.
या निष्कर्षानंतर कंपनीने अपील केले. त्यानुसार नमुना पुढील तपासणीसाठी रेफरल फूड लॅबोरेटरीकडे पाठवण्यात आला. मात्र, या प्रयोगशाळेच्या तपासणीतही पाण्यात पॉलीसायक्लिक अॅरोमॅटिक हायड्रोकार्बन्स (PAHs) आढळल्याचे समोर आले. त्यामुळे दुसऱ्या तपासणीतही नमुना असुरक्षित ठरला. या निष्कर्षांच्या आधारे FSSAI ने अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ अंतर्गत बिसलेरी कंपनीविरोधात खटला चालवण्यास मंजुरी दिली आहे.
पाण्यातील रासायनिक घटकांमुळे आरोग्याची चिंता
ब्रोमेट हा संभाव्य कर्करोगकारक घटक मानला जातो. तर काही प्रकारचे पॉलीसायक्लिक अॅरोमॅटिक हायड्रोकार्बन्सदेखील आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यात या घटकांची उपस्थिती आढळल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. आता या प्रकरणात न्यायालयीन सुनावणीदरम्यान कोणते तथ्य समोर येतात, याकडे लक्ष लागले आहे.
इतर चार कंपन्यांवरही कारवाईचा बडगा
बिसलेरीसोबतच FSSAI ने आणखी काही खाद्य कंपन्यांविरोधात कारवाई केली आहे. वसंत मसाला प्रायव्हेट लिमिटेड, टीआयटी-बीआयटी फूड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मिमांसा इंडस्ट्रीज आणि आशा कन्फेक्शनरी या चार कंपन्यांविरोधात न्यायालयीन खटला चालवण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
याशिवाय उर्मी लाइफ सायन्सेस LLP आणि गौर आयुर्वेदिक स्टोअर या दोन कंपन्यांचे परवाने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आशा कन्फेक्शनरीच्या 'प्री-पॅक्ड चॉकलेट फिल्ड कुकीज' या उत्पादनाच्या तपासणीत ते असुरक्षित आढळल्याने कंपनीला संबंधित उत्पादन बाजारातून परत मागवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
बिसलेरीच्या सर्व उत्पादनांबाबत निष्कर्ष नाही
दरम्यान, बिसलेरीच्या एका पाण्याच्या नमुन्याच्या तपासणीत असुरक्षित घटक आढळले असले, तरी कंपनीची सर्वच उत्पादने असुरक्षित आहेत, असे म्हणता येणार नाही. संबंधित नमुना कोणत्या उत्पादन केंद्रातून घेण्यात आला होता, त्याचा बॅच क्रमांक काय होता आणि रासायनिक घटकांचे प्रमाण किती होते, याबाबत अधिकृत तपशील समोर येणे आवश्यक आहे. तसेच संबंधित उत्पादन बाजारातून मागे घेण्याची आवश्यकता आहे का, याबाबतही स्पष्टता अपेक्षित आहे.
FSSAI कडून खाद्य कंपन्यांवरील देखरेख वाढवली
अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि ग्राहकांची सुरक्षितता लक्षात घेऊन FSSAI कडून विविध खाद्य उत्पादक कंपन्यांवर कारवाई केली जात आहे. दिवाळीच्या काळातही दिल्ली, मुंबईसह देशातील अनेक शहरांमध्ये भेसळयुक्त मावा आणि अन्य खाद्यपदार्थांविरोधात तपासणी मोहीम राबवण्यात आली होती. निकृष्ट किंवा असुरक्षित आढळलेल्या उत्पादनांवर कारवाई करत काही उत्पादनांना बाजारातून हटवण्याचे निर्देश देण्यात आले होते.आता बिसलेरीसारख्या लोकप्रिय ब्रँडच्या पाण्याच्या नमुन्याबाबत आलेल्या निष्कर्षांमुळे बाटलीबंद पाण्याच्या गुणवत्तेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.