नवी दिल्ली : आजच्या डिजिटल युगात व्हॉट्सॲप हा संवादाचा सर्वाधिक वापरला जाणारा पर्याय बनला आहे. वैयक्तिक संभाषणांपासून ते ऑफिसमधील कामकाजापर्यंत अनेक गोष्टींसाठी व्हॉट्सॲपचा वापर केला जातो. विशेषतः ऑफिसमध्ये काम करताना मोबाईलऐवजी कॉम्प्युटरवर WhatsApp Web वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, व्हॉट्सॲप वेब वापरल्यानंतर लॉगआउट न करताच बाहेर पडण्याची सवय तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. केवळ ब्राउजरचा टॅब बंद केला म्हणजे व्हॉट्सॲप अकाऊंट लॉगआउट झाले, असा अनेकांचा समज असतो. प्रत्यक्षात कॉम्प्युटरवर तुमचे लॉग-इन सेशन सुरू राहू शकते. अशा परिस्थितीत दुसऱ्या व्यक्तीला तुमचे खासगी संदेश वाचता येऊ शकतात, तसेच तुमच्या नावाने इतरांना मेसेज पाठवून आर्थिक फसवणूक करण्याचाही धोका निर्माण होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सायबर सुरक्षा यंत्रणेने व्हॉट्सॲप वापरकर्त्यांना महत्त्वाचा इशारा दिला आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतील भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने (I4C) WhatsApp Web वापरणाऱ्यांसाठी सुरक्षेसंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. I4C च्या राष्ट्रीय सायबर क्राइम थ्रेट ॲनालिटिक्स युनिटने (NCTAU) १८ नोव्हेंबर २०२६ रोजी या सूचना प्रसिद्ध केल्या. त्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी किंवा ऑफिसमधील सामायिक कॉम्प्युटरवर व्हॉट्सॲप वापरताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आधीपासून सुरू असलेल्या व्हॉट्सॲप वेब सेशनचा गैरवापर करून दुसऱ्या व्यक्तीकडून खात्याचा अनधिकृत वापर होण्याची शक्यता या सूचनांमधून अधोरेखित करण्यात आली आहे.
नेमका धोका काय? तुमच्या नावाने दुसरी व्यक्ती पाठवू शकते मेसेज
अनेकदा ऑफिसमध्ये कामाचा व्याप असल्यामुळे कर्मचारी स्वतःच्या मोबाईलमधील व्हॉट्सॲप कॉम्प्युटरशी लिंक करतात. यामुळे टायपिंग करणे, फाइल्स पाठवणे आणि संदेशांना उत्तर देणे सोपे होते. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर लॉगआउट न करता कॉम्प्युटर सोडल्यास त्याच डिव्हाइसचा वापर करणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीला तुमच्या व्हॉट्सॲप अकाऊंटमध्ये प्रवेश मिळू शकतो.
अशा व्यक्तीला तुमचे वैयक्तिक संभाषण, ऑफिसमधील चॅट, संपर्क यादी आणि विविध ग्रुपमधील संदेश पाहता येऊ शकतात. त्याचबरोबर तुमच्या अकाऊंटवरून इतरांना संदेश पाठवण्याचीही शक्यता असते. विशेष म्हणजे, समोरच्या व्यक्तीला हा संदेश तुमच्याकडूनच आला आहे, असे वाटू शकते. त्यामुळे तुमच्या ओळखीच्या व्यक्तींना विश्वासात घेऊन पैशांची मागणी करणे, बनावट लिंक पाठवणे किंवा फसवणुकीसाठी संदेश पाठवणे असे प्रकार घडू शकतात.
यामुळे धोका केवळ वैयक्तिक माहिती उघड होण्यापुरता मर्यादित राहत नाही. तुमच्या व्हॉट्सॲप अकाऊंटचा वापर करून इतर लोकांनाही सायबर फसवणुकीचे लक्ष्य केले जाऊ शकते. त्यामुळे कॉम्प्युटरवर व्हॉट्सॲप वापरताना लॉगआउट करण्याकडे दुर्लक्ष करू नये.
फक्त टॅब किंवा विंडो बंद करणे पुरेसे नाही!
व्हॉट्सॲप वेब वापरणाऱ्या अनेकांची एक सामान्य चूक म्हणजे काम झाल्यानंतर ब्राउजरचा टॅब बंद करून कॉम्प्युटर सोडणे. मात्र, ब्राउजर बंद करणे आणि व्हॉट्सॲप अकाऊंटमधून लॉगआउट करणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. टॅब किंवा विंडो बंद केल्याने लॉग-इन सेशन संपेलच असे नाही. त्यामुळे दुसऱ्या वेळी त्याच कॉम्प्युटरवरून व्हॉट्सॲप उघडल्यास आधीचे सेशन सुरू असल्याचा धोका असू शकतो.
यासाठी व्हॉट्सॲप वेबमधील मेन्यूमध्ये जाऊन स्वतः Log Out करणे आवश्यक आहे. विशेषतः ऑफिसमधील शेअर केलेले कॉम्प्युटर, सायबर कॅफे, हॉटेलमधील बिझनेस सेंटर, सार्वजनिक किऑस्क किंवा दुसऱ्या व्यक्तीचा कॉम्प्युटर वापरताना ही खबरदारी अधिक महत्त्वाची ठरते. शक्यतो अनोळखी किंवा सार्वजनिक कॉम्प्युटरवर वैयक्तिक व्हॉट्सॲप अकाऊंट लॉग-इन करणे टाळावे.
मोबाईलवरून तपासा, तुमचे व्हॉट्सॲप कोणत्या डिव्हाइसवर सुरू आहे?
तुमचे व्हॉट्सॲप अकाऊंट सध्या कोणत्या कॉम्प्युटर किंवा डिव्हाइसशी जोडलेले आहे, हे तपासण्यासाठी प्रत्येक वेळी कॉम्प्युटरची गरज नाही. मोबाईलमधील Linked Devices या पर्यायातून ही माहिती सहज मिळू शकते. या सुविधेमुळे आपल्या अकाऊंटशी जोडलेल्या डिव्हाइसेसची यादी पाहता येते आणि गरज पडल्यास संबंधित डिव्हाइसवरून लॉगआउटही करता येते.
अँड्रॉइड मोबाईलधारकांनी काय करावे?
- सर्वप्रथम मोबाईलमध्ये WhatsApp उघडा.
- स्क्रीनच्या उजव्या बाजूला वर असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा.
- त्यानंतर Linked Devices हा पर्याय निवडा.
- तुमच्या अकाऊंटशी जोडलेल्या डिव्हाइसेसची यादी तपासा.
- अनोळखी किंवा वापरत नसलेले डिव्हाइस दिसल्यास त्यावर क्लिक करून Log Out करा.
आयफोन वापरकर्त्यांनी काय करावे?
- सर्वप्रथम WhatsApp सुरू करा.
- त्यानंतर Settings या पर्यायावर जा.
- येथे Linked Devices हा पर्याय निवडा.
- जोडलेल्या डिव्हाइसेसची माहिती तपासा.
- अनोळखी डिव्हाइस आढळल्यास ते निवडून Log Out करा.