सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 पूर्ण तपशील

धक्कादायक!: नवजात अर्भकांचा व्यापार करणारी महिला टोळी अटकेत!

डिजिटल पुणे    15-04-2024 12:39:54

पुणे : पिंपरी चिंचवडमधील वाकड पोलिसांनी नवजात अर्भकांचा व्यापार करणार्‍या एका टोळीचा 'पर्दाफाश' केला आहे. सहा सराईत गुन्हेगार महिलांना अटक केली असून या रॅकेटमध्ये पुण्यातील एका प्रसिद्ध रुग्णालयातील परिचारिकेचाही समावेश असल्याची माहिती आहे.१२ एप्रिल रोजी दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास पिंपरी चिंचवड शहरातील जगताप डेअरी परिसरात अर्भक विक्रीसाठी आलेल्या या महिला गुन्हेगारांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली.त्यांच्यावर वाकड पोलीस स्टेशनमध्ये भादवी 370 (3)(4) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार वंदू गिरे यांना या महिला जगताप डेअरी परिसरात अर्भक विक्रीसाठी येणार असल्याची खबर मिळाली होती. पोलीसपथक तेथे दबा धरून थांबले. दुपारी सव्वाबाराच्या  सुमारास दोन रिक्षांमधून सहा महिला आल्या. पोलिसांनी त्यांना थांबवून त्यांच्याकडे असलेले अर्भक कोणाचे आहे याची चौकशी केली. त्यावेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यांना ताब्यात घेत पोलीसठाण्यात नेऊन कसून चौकशी केल्यावर त्यांनी एका महिलेचे ७ दिवसांचे अर्भक ५ लाख रुपयांना विकण्यासाठी आणल्याची कबुली दिली.

तसेच आजवर ५ अर्भकांची अशाप्रकारे विक्री केल्याची कबुलीही या महिलांनी दिली आहे. या प्रकरणात पुण्यातील एका प्रसिद्ध रुग्णालयातील परिचारिकेचाही समावेश असल्याची माहिती या महिलांनी पोलिसांना दिली आहे. गरीब, गरजू दांपत्याला आपले मूल विकण्यास तयार करून ते दुसर्‍यांना विकण्याचा उद्योग ही टोळी करत होती. यातील परिचारिका अशी गरजू दांपत्ये हेरण्याचे काम करत होती असेही या महिलांनी पोलिसांना सांगितल्याचे समजते.

ही कामगिरी पोलीसआयुक्त विनयकुमार चौबे, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त बापू बांगर, सहायक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर, निरीक्षक विठ्ठल साळुंखे, रविकिरण नाळे, उपनिरीक्षक सचिन चव्हाण, अनिरुद्ध सावर्डे, श्रेणी उपनिरीक्षक बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, सहायक फौजदार राजेंद्र काळे, अंमलदार वंदु गिरे, संदिप गवारी, स्वप्निल खेतले, अतिश जाधव, प्रमोद कदम, दिपक साबळे, अतिक शेख, विक्रांत चव्हाण, प्रशांत गिलबीले, रामचंद्र तळपे, विनायक घार्गे, अजय फल्ले, सौदागर लामतुरे, स्वप्निल लोखंडे, कौंतेय खराडे, भास्कर भारती, रमेश खेडकर, ज्ञानदेव झेंडे, महिला अंमलदार रेखा धोत्रे, जयश्री वाखारे, ज्योती तुपसुंदर यांनी केली. अधिक तपास उपनिरीक्षक सचिन चव्हाण करत आहेत.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती