सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 पूर्ण तपशील

अनिर्वाच्य निरुपण (भाग ३)

डिजिटल पुणे    21-04-2024 10:35:41

अनिर्वाच्य निरुपण (भाग ३)

अत्यंत विचाराचे बोल | तरी ते माईक फोल | शब्द सबाह्य सखोल | अर्थचि अवघा ||६/१०/१८||

अतिशय विचारांनी भरलेले शब्द जरी बोलले तरी ते दृश्य असतात. मायेच्या क्षेत्रातील असतात. असार असतात. नाशवंत असतात. परंतु त्यांचा अर्थ सूक्ष्म असतो. अदृश्य असतो. तो अर्थ शब्दांना आतबाहेर व्यापून राहतो.

भूस सांडून कण घ्यावा | तैसा वाच्यांश त्यजावा | कण लक्ष्यांश लक्षावा | शुद्ध स्वानुभवे ||६/१०/२४||

भूस टाकून धान्याचा कण वेचतात तसा सद्गुरू गूढ अनुभव शब्दात सांगत असताना शिष्याने शब्दाचा वाच्यांश टाकावा कारण तो भुसासमान असतो. त्यातील लक्ष्यांश हा कण होय तो वेचावा. त्याच्या कडे लक्ष द्यावे. शुद्ध आत्म साक्षात्काराने तो अर्थ संपूर्ण ग्रहण होतो.

सद्गुरूंचे शब्द ऐकता ऐकताच उच्च धारणेचा साधक त्या शब्दातून मिळणारी सद्गुरू कृपा, सूक्ष्म अर्थ ग्रहण करतो आणि आपोआप त्याला समाधी लागते. एका समाधीतून पुढील समाधीत प्रवेश करताना तो सूक्ष्म अर्थ अधिक ग्रहण केला जातो. म्हणजे श्रवण व अनुभव दोन्ही एकाचवेळेला चालतात. आत्मवस्तू दृश्याहून भिन्न आहे हा शब्द समूह वाच्यांश आहे. या शब्द समूहांचा अर्थ तो लक्ष्यांश आहे. शब्दाचा उच्चार हे भाषेचे बाह्य अंग असते तर शब्दाचा अर्थ हे अंतरंग असते. बोलणाऱ्याचा शब्द ध्वनी कानावर पडतो पण मनाला त्याच्या अर्थाचा बोध होतो. म्हणजे शब्द अर्थाचे वाहक असतात. शब्दाचा संबंध शरीराशी व अर्थाचा संबंध मनाशी असतो. मनातील विचार अर्थरूप असतात. जे शब्दातून बोलले जातात. ज्यायोगे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला शब्दाद्वारे अर्थ पोहोचतो.

अर्थात मन कितीही सूक्ष्म अर्थ समजून घेऊ शकले तरी त्याला मर्यादा आहेत. काही अनुभव मनाच्या पल्याडचे आहेत. अर्थमय शुद्ध बोध आत्मवस्तूच्या अलीकडेच थांबतो. मन स्वरूपाच्या अनुभवापर्यंत जाऊ शकत नाही. म्हणून कितीही बुद्धीच्या स्तरावर तत्त्वज्ञान समजले तरी स्वरूपाचा अनुभव मिळत नाही. संत आत्मबुद्धीच्या भूमिकेवर असतात.  त्यांचा अनुभव सामान्य व्यक्तीपेक्षा भिन्न असतो. द्रष्टा हा स्वरूपाशी एकरस होतो. मी तोच आहे हे सुद्धा शिल्लक राहत नाही. केवल अद्वैत राहते. अशावेळी अनुभव घेणे ही भाषाही वापरता येत नाही. तो अनुभव व्यक्त करण्यासाठी मग प्रतीके, कल्पना यांचा वापर संत करतात. दृश्यामधील अतिशय सूक्ष्म अनुभव घेऊन तो स्वरूप साक्षात्काराचे त्याच्याशी साम्य दाखवावे लागते. हा कल्पनेचा प्रकार असल्याने तो खरा नसतो. पण त्याशिवाय संतांना पर्याय नसतो.

जेथे गाळून सांडिले नभा | जो अनुभवाचा गाभा | ऐसा तोहि उभा | कल्पित देव ||२६/१०/७||

आपल्या अनुभवात आकाश अतिशय सूक्ष्म आहे. पण ते देखील गाळून घेतले तर त्यास आत्मस्वरूपाच्या सूक्ष्मपणाची सर येईल. असे ते स्वरूप सर्व अनुभवांचा अंतर्भाग आहे. अर्थात हे स्वरूप वर्णन म्हणजे बळेच कल्पना ताणून केलेले आहे.

मुळात कल्पनाच खरी नाही. त्यापासून जे निर्माण होते तेही खरे नाही. त्यामुळे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आपण ज्याला अनुभव म्हणतो त्याला स्थान नाही. कारण अनुभव येण्यास अनुभव घेणारा आणि ज्याचा अनुभव घ्यायचा ते, अशी दोन तत्वे असावी लागतात. पण आत्मस्वरूपात अनुभव घेणारा शिल्लक उरत नाही. तेथे दोनपण नसते. म्हणून मी स्वरूपाचा अनुभव घेत आहे या अवस्थेला स्वरूप साक्षात्कारात जागा नाही.

संशोधन व लेखन – कथाव्यास श्री. दामोदर प्र. रामदासी, पुणे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती