सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 DIGITAL PUNE NEWS

पुणे-पिंपरी चिंचवडचे नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकारणात मागे पडत चालले आहे काय?

डिजिटल पुणे    02-10-2023 08:44:36

 पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर औद्योगिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक तसेच माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात बरेच पुढे गेले. पण तसे पाहिले तर राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे असुन देखील मागे पडले. मागे पडले मी या अर्थाने म्हणतोय की गेल्या १५ वर्षांमध्ये पुणे किंव्हा पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरामधून महाराष्ट्राच्या राजकारणावर आपली छाप सोडेल (केंद्र तर खूपच दूर राहिले) असा एकही राजकारणी व्यक्तिमत्त्व उदयास येऊ शकलेले नाही. जे काही मातब्बर मंडळी दोन्ही शहरात आहेत ती स्थानिक मुद्दयांपुरते मर्यादित असल्याचे दिसून येतात.

 स्वातंत्र्यपूर्वीचा काळ पाहिला तर पुण्याला देशाच्या राजकारणामध्ये किती महत्त्वाचे स्थान होते हे इतिहासात आपण वाचलेच आहे. लोकमान्य टिळक, महात्मा फुले, गोपालकृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर, चिंचवडमधून चाफेकर बंधू अशा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला व देशावर आपली छाप सोडली. स्वातंत्र्यानंतरचा काळ पाहिला तर अख्ख्या देशावर राज्य करणाऱ्या काँग्रेसचे मुख्य प्रवक्तेपद पुण्यातील बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांच्याकडे होते. माजी पंतप्रधान इंदिराजींचे अतिशय विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात “संरक्षण उत्पादन मंत्री” तसेच राजीव गांधींच्या काळात “माहिती आणि नभोवाणी” अशा त्यावेळच्या महत्त्वपूर्ण खात्यांची जबाबदारी पेलली होती. 

इंदिरा गांधी यांच्या समवेत बॅ. विठ्ठलराव गाडगीळ

    त्यानंतर माजी केंद्रीय मंत्री मोहन धारिया हे देखील पुण्यातून होते. आणीबाणीच्या वेळी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या धोरणाला विरोध करून त्यांच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडून राजकारणात एकच खळबळ माजवून दिली होती. त्यानंतरच्या मोरारजी देसाई यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात वाणिज्य, नागरी पुरवठा व सहकार खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. 
मोहन धारिया

    अगदी नजीकचा काळ पाहिला तरी पुणे हा काँग्रेसचा बालेकिल्लाच होता. पिंपरी चिंचवड येथून प्रा. रामकृष्ण मोरे हे विलासराव देशमुख यांच्या मंत्रीमंडळात शिक्षण, सांस्कृतिक, क्रीडा व युवक कल्याण या चार खात्यांचे मंत्री होते.

प्रा. रामकृष्ण मोरे

त्याच बरोबर पुण्यातून “सबसे बडा खिलाडी, सुरेश कलमाडी” या घोषणा बऱ्याच वर्ष चालल्या. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात ते रेल्वे खात्याचे राज्यमंत्री होते. पुणे फेस्टिवल व पुण्यात कॉमनवेल्थ गेम्स भरवण्यामागे कलमाडी यांचीच मेहनत होती. त्यामध्ये कॉमनवेल्थ घोटाळा झाला ती बाब वेगळी. मात्र राज्य आणि केंद्रात त्यांचा एक वेगळाच दरारा होता. 

सुरेश कलमाडी

    त्यानंतर पुणे या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपचे कमळ फुलवणारे गिरीश बापट यांचा देखील राज्याचा राजकारणात दरारा होता. कसब्यातून सलग पाच वेळा आमदारपदी ते निवडून आले होते. ९५ च्या युतीच्या सरकारमध्ये त्यांच्याकडे कृष्णा खोरे विकास महामंडळाची जबाबदारी होती, त्यानंतर २०१४-१९ साली देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन तसेच संसदीय कार्य अशा महत्त्वाच्या खात्याचे ते मंत्री राहिले आहेत. 

गिरीश बापट

    कॅंटॉन्मेंट मधून सलग दोन वेळा आमदार झालेले काँग्रेसचे रमेश बागवे हे देखील वर्षभरासाठी राज्याचे गृहराज्य मंत्री होते. मात्र त्यांच्या या कारकिर्दीमध्ये त्यांना म्हणावा तेवढा प्रभाव राज्याच्या राजकारणात टाकता आला नाही, मात्र त्यांच्या पक्ष निष्ठेमुळे व शहर काँग्रेसमध्ये केलेल्या कार्यामुळे त्यांना मंत्रिपद मात्र अनुभवता आले.

रमेश बागवे

    या सर्व नेत्यांची सुरुवात ही स्थानिक मुद्द्यांपासून व स्थानिक स्वराज्य संस्थेतूनच झाली होती, त्यानंतर त्यांनी आपल्या कार्याची छाप उमटवत राज्याच्या व देशाच्या राजकारणात आपली ओळख निर्माण केली होती. तशीही सुरुवात स्थानिक पातळीवरूनच होत असते, मात्र जसे बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात तसेच सध्या पुण्याच्या राजकारणात असणाऱ्या एकाही बाळाचे पाय भविष्यात राज्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण ठरतील असे दिसत नाहीयेत. राज्यपातळीवरील कोणत्याही निर्णयामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील आत्ताच्या आमदारांना सामील केले जात असल्याचे सध्यातरी चित्र दिसत नाहीय. इतर जिल्ह्यांचा विचार केला असता नागपूरमधून भाजपमधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नाशिक मधून राष्ट्रवादीचे छगन भुजबळ, भाजपमधून केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार, शिवसेनेचे मंत्री दादा भुसे, बारामतीमधून पवार कुटुंबीय, कोल्हापूरमधून मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील, चंद्रकांत पाटील (मूळचे कोल्हापूर), अहमदनगरमधुन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, लातूर मधून काँग्रेसचे माजी मंत्री अमित देशमुख, अमरावतीमधून राणा पती-पत्नी, साताऱ्यातून उदयनराजे भोसले, सांगलीतून डॉ. पतंगराव कदम, ठाण्यातून खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाड, रायगड मधून माजी मंत्री वर्षा गायकवाड, भरत गोगावले, मुंबईतून ठाकरे कुटुंबीय, राज ठाकरे, आशिष शेलार, किरीट सोमय्या, राम कदम, अबू आझमी, नवाब मलिक असे अनेक नावे वेगवेगळ्या जिल्ह्यातून व शहरातून नावे घेता येतील. हे सर्व नेते राज्याच्या व देशाच्या राजकारणात मातब्बर मानले जातात. पण पुण्यातून व पिंपरी चिंचवड शहरातून या नेत्यांच्या पातळीवर पोहोचणारे अशा किती नेत्यांची नावे सांगता येतील? बरेच मोठे नेते इथे आहेत, पण सर्व स्थानिक पातळीवर मर्यादित, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांचे वजन नगण्य असल्याचे जाणवते. 

    पुणे आणि पिंपरी चिंचवडसारख्या शहरामध्ये सुरेश कलमाडी, रामकृष्ण मोरे, रमेश बागवे आणि गिरीश बापटांनंतर एकही मंत्रीपदाच्या लायक उमेदवार उरलेला नाही. अजित पवार व चंद्रकांत पाटील हे कितीही पुणे आपले म्हणून सांगत असले तरी ते बाहेरचे उमेदवार आहेत. अनेक पातळीवर आपला नावलौकिक गाजवत असणाऱ्या या शहरातून एकही राज्यपातळीवरचा नेता तयार होऊ नये ही शोकांकिताच आहे. पुण्यातून भाजपच्या मुक्ता टिळक, मेधा कुलकर्णी तसेच पिंपरी चिंचवड मधून लक्ष्मण जगताप यांना भाजप पुढे आणू शकली असती पण वेळच्यावेळी त्यांना डावलण्यात आले. सध्या पाहायला गेले तर भाजपच्या पिंपरी चिंचवड येथील महेश लांडगे वगळता कोणीही नेता पुढे राज्याच्या मंत्रीमंडळावर येईल असे दिसत नाहीय. कसब्यातून काँग्रेसकडून निवडून आलेले धंगेकर यांना प्रचंड जनाधार आहे, पक्षाकडून म्हणावे तेवढे सहकार्य मिळत नसल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीतील नेते अजून शहराच्या मुद्दयांपुरते मर्यादित आहेत. मनसेमधून वसंत मोरे आहेत मात्र त्यांना देखील पक्षपातळीवरून सहकार्य नाही. पुण्यातून जाणूनबुजून नेतृत्व पुढे न येऊ देण्याच्या हालचाली अनेक वर्षे चालत आलेल्या आहेत. मात्र पुणेकर नेत्यांच्या या गोष्टी लक्षात येतात की नाही हे महत्वाचे आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या महत्वकांक्षेला वारंवार बाहेरून मार पडत असल्याचे पाहायला मिळते. स्थानिक मुद्यांचे निराकरण देखील राज्यपातळीवरून होत असल्याने, राज्याच्या राजकारणात जेवढे महत्व तेवढेच स्थानिक मुद्दे देखील लवकर सुटतात. जो पर्यंत स्थानिक कार्यकर्ते यासाठी आग्रही रहात नाहीत व स्थानिक नेतेही आपला चाकोरीबद्धपणा व स्थानिक मुद्दे सोडून राज्याच्या राजकारणात आपले वजन वाढवत नाहीत तोपर्यंत पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या वाट्याला उपेक्षाच येणार ही काळ्या दगडावरील रेघ आहे. 


 News Feedback

Digital Pune
vijay chavan
 02-10-2023 09:28:29

Yes 100% PCMC is lagging with great leadership due to internal politics

 Give Feedback



 जाहिराती