सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • युद्धखोर इस्त्रायलचा पहिल्याच दिवशी युद्धविरामाला सुरुंग, लेबनाॅनमध्ये 10 मिनिटात 254 जणांच्या कत्तली; अमेरिकेनं सुद्धा पलटी मारली; संतप्त इराणनं होर्मुझ मार्ग पुन्हा रोखला, उद्यापासून चर्चा होणार तरी कशी?
  • मोठी बातमी: राजकारणातील अचंबित करणारी घटना, देवेंद्र फडणवीसांचा हर्षवर्धन सपकाळांना फोन
 क्राईम

पुण्यात महिला प्राचार्याची ब्लॅकमेलिंग; ७ लाखांची खंडणी प्रकरणी तीन पोलिसांवर गुन्हा, दलात खळबळ

डिजिटल पुणे    09-04-2026 13:09:14

पुणे : कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांकडूनच खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. एका नामांकित शैक्षणिक संस्थेतील महिला प्राचार्याला धमकावून तब्बल ७ लाख रुपये उकळल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह तीन पोलिसांविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात अजित बडे, सोनाली हिंगे आणि सुदाम तायडे अशी आरोपींची नावे समोर आली आहेत. अजित बडे हे सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत असून, सोनाली हिंगे या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ‘दामिनी मार्शल’ म्हणून कार्यरत आहेत. त्या सोशल मीडियावर ‘रील स्टार’ म्हणूनही ओळखल्या जातात. सुदाम तायडे यांचीही शिवाजीनगर येथे नियुक्ती आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमताने महिला प्राचार्याला जाळ्यात ओढले. ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा दाखल होऊ शकतो, तसेच अटकेची कारवाई होईल, अशी भीती दाखवत त्यांनी प्राचार्यांवर दबाव टाकला. स्वतः पोलीस असल्याचा धाक दाखवत प्रकरण मिटवण्यासाठी ७ लाख रुपयांची मागणी करण्यात आली. बदनामी आणि अटकेच्या भीतीने संबंधित प्राचार्यांनी ही रक्कम दिली.

नंतर संपूर्ण प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली.

आयुक्तांकडून तातडीची कारवाई

तक्रार प्राप्त होताच पोलीस आयुक्तांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले. प्राथमिक तपासात पोलिसांचा सहभाग स्पष्ट झाल्यानंतर संबंधित तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले. विशेषतः सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा या प्रकरणात सहभाग असल्याने चर्चेला उधाण आले आहे.

पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्का

या घटनेमुळे पोलीस दलाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी असलेल्या यंत्रणेकडूनच अशा प्रकारे वर्दीचा गैरवापर होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. आता दोषींवर पुढे काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती