सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 व्यक्ती विशेष

शरद पवार यांच्या उपस्थितीत सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा फुटला नारळ

पुजा    19-04-2024 13:03:25

पुणे : जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या ‘उत्सवा’ला आज, शुक्रवारी सुरुवात होत आहे. लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात देशातील १९ राज्ये व २ केंद्रशासित प्रदेशांमधील १०२ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होईल.तर दुसरीकडे पुढील टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी आज अनेक ठिकाणी प्रचाराला सुरुवात होत आहे. पवारांचा बाले किल्ला असलेला बारामती मध्ये आज बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे यांनी प्रचाराचा नारळ वाढवला. कन्हेरी येथील मारुती मंदिरासमोर शरद पवारांनी नारळ वाढवून सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा आरंभ केला. यावेळी शरद पवार, श्रीनिवास, सुनंदा पवार, रोहित पवार, युगेंद्र पवार या कुटुंबातील मंडळींसह पक्षातील नेते-कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी कालच उमेदवारी अर्ज दाखल केला. बारामती मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात सात मे रोजी मतदान होणार आहे. त्यांच्याविरुद्ध भावजय सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या तिकिटावर रिंगणात असून त्यांनीही कालच उमेदवारी दाखल केला. 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नास्तिक की आस्तिक अशी कधीतरी चर्चा होत असते. कारण  शरद पवार यांनी कधीही आपल्या श्रद्धांचे जाहीर प्रदर्शन केले नाही. पवार यांनी आपल्या धार्मिक आस्था या नेहमीच सार्वजनिक जीवनापासून दूर ठेवल्यात. मात्र, वस्तुस्थिती काहीशी वेगळी असल्याचे समोर आले आहे. बारामती तालुक्यातील कन्हेरी येथील मारुती मंदिरावर पवार कुटुंबीयांची श्रद्धा असल्याचे म्हटले जाते. या मंदिराचे पुजारी महादेव शिंदे यांनीदेखील याला दुजोरा दिला आहे. पवार कुटुंबीयांनी वर्षानुवर्षे कन्हेरी येथील मारुती मंदिरावर श्रद्धा ठेवली असल्याचे त्यांनी सांगितले. 

शरद पवार यांनी १९६७मध्ये  पहिली  आमदारकीची निवडणूक लढवली. त्यावेळेपासून मारुती मंदिरात नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला जातो. छोटी असो किंवा मोठी  येथे नारळ फोडूनच प्रचाराची सुरुवात केली गेली आहे. आजही परंपरा आजही जपली गेली आहे. यंदाची निवडणूक ही वेगळी आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतरची ही पहिली निवडणूक आहे. नणंद - भावजय यांच्यात जरी ही लढत असली तरी   बारामती काकांची की पुतण्याची याचा फैसला होणार आहे. आज सुप्रिया सुळे यांचा तर उद्या सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ त्याच मंदिरातून होणार आहे. त्यामुळे पवार कुटुंबियांचे  श्रद्धास्थान असलेला कण्हेरीचा मारुती कोणाला पावणार या कडे सर्वाचे लक्ष लागले आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती