सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 व्यक्ती विशेष

सुनेत्रा पवारांच्या अर्जासोबत असलेल्या प्रतिज्ञापत्रातुन समोर आली तब्बल १२३ कोटींची संपत्ती ; वाचा नक्की काय काय आहे नावावर ?

पुजा    19-04-2024 15:24:10

पुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघात सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी तगडी लढत होणार आहे. बारामतीमधल्या या नणंद भावजयीच्या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेऊन आरती करुन सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी दोघेही  दगडूशेठ चरणी लिन झाले आणि विजयासाठी साकडं घातलं. तर सुप्रिया सुळेंच्या विजयासाठी शरद पवार हे बारामतीमध्ये तळ ठोकून आहेत. आणि आज बारामतीमध्ये कन्हेरी येथील मारुती मंदिरासमोर शरद पवारांनी नारळ वाढवून सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा आरंभ केला. 

 नणंद भावजय दोघीनींही आपले अर्ज दाखल केल्यामुळे आता या अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रातून सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांच्या संपत्तीबाबत माहिती समोर आली आहे. सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून सुनेत्रा पवार अब्जाधीश असल्याची माहिती समोर आली आहे आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार, अजित पवार आणि कुटुंबीयांची एकत्रित मालमत्ता १२३ कोटी ४६ लाख १७ हजार ७५८ रुपये इतकी आहे.  सुनेत्रा पवारांकडे एकूण स्थावर मालमत्ता ५८ कोटी ३९ लाख ४० हजार ७५१ इतकी आहे. तर त्यांची स्वसंपादित मालमत्ता ही १८ कोटी ११ लाख ७२ हजार १८५ रुपये आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे शेअर्स/ बॉन्ड इत्यादीच्या माध्यमातून १५ लाख ६९ हजार ६१० रुपयांची संपत्ती आहे. तर बचत पत्रांमधून सुनेत्रा पवारांकडे ५७ लाख ७६ हजार ८७७ रुपये आहेत. 

सुनेत्रा पवार यांच्या हातामधील रोख रक्कम ३ लाख ९६ हजार इतकी आहे. त्यांच्या बॅंकेमध्ये ५ कोटी ३० लाख ७५ हजार रुपयांच्या ठेवी आहेत. तर ६३ लाख ७३ हजार ३६० रुपयांचे दागिने सुनेत्रा पवारांकडे आहेत. या दागिन्यांमध्ये ७५ किलो चांदी, एक किलो सोने, हिऱ्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. सुनेत्रा पवार यांच्या नावावर एक ट्रॅक्टर, दोन ट्रेलर आहेत. मात्र त्यांच्याकडे स्वतःची एकही चारचाकी नाही. तर अजित पवार यांच्या नावावर तीन ट्रेलर, एक ट्रॅक्टर आणि दोन कार आहेत. या वाहनांची एकूण किंमत ही ८६ लाख ४२ हजार १०२ रुपये इतके आहे. यासोबत पवार कुटुंबीयांकडे एकूण  २९ कोटी ६५ लाख २९ हजार ८१३ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. सुनेत्रा पवार यांनी वाणिज्य शाखेतून पदवी प्राप्त केलीय. तर सुनेत्रा पवार शेती आणि व्यवसाय करतात अशी माहिती प्रतिज्ञापत्रात देण्यात आलीय.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती