सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 व्यक्ती विशेष

पुतण्यानंतर आता सुप्रिया सुळेंची लेक सुद्धा प्रचारात सक्रिय

पुजा    25-04-2024 15:18:00

पुणे : आईच्या प्रचारासाठी आता रेवती सुळे मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतेय. रेवती सुळेंकडून बारामतीत सुप्रिया सुळेंचा प्रचार सुरु आहे. अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार आणि रेवती सुळे बारामतीत झालेल्या पदयात्रेत सहभागी झाली होते. यंदाच्या निवडणुकीत पवार कुटुंबातील लेकी- सुनांच्या उमेदवारीची चर्चा असताना सुप्रिया यांना पवार कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळताना दिसतोय.

या मतदारसंघातून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार आहे. सुनेत्रा पवार या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे या मतदार संघात नणंद विरुद्ध भावजयी अशी लढत पहायला मिळणार आहे. सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी अजितदादांनी अधिक जोर लावला असून सुळे यांच्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार रणनिती आखत आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होणार आहे. प्रचारासाठी अवघे दहा दिवस शिल्लक राहिल्याने महाविकास आघाडी तसेच महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहे. यंदाच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत बारामती मतदारसंघावर महायुतीच्या माध्यमातून विजय मिळवायचाच असा संकल्प केंद्रात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाने केला आहे.

यापूर्वी दोनवेळा बारामती लोकसभा मतदारसंघातील खासदार सुप्रिया सुळे यांना पराभवाचा धक्का देण्याचे स्वप्न भाजपने पाहिले होते. मात्र त्यामध्ये यश आले नाही. त्यामुळे यंदाच्या वर्षी राज्यातील एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारलार जाहीरपणे पाठींबा देत सत्तेत आणि पर्यायाने महायुतीत सहभागी झालेल्या अजित पवार यांच्या माध्यमातून बारामतीचा गड जिंकण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

दरम्यान, अजित पवारांच्या आमदारीची स्वप्ने पडत असल्याच्या वक्तव्यावर अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार म्हणाले, मला आमदारकीची स्वप्नं पडत नाही माझ्या मनात देखील आलं नाही. सध्या मी प्रचार करत नाही. अजून मी आमदारकीचा विचार केला नाही. याचा गंभीरपणे विचार केला नाही. विचार करेल आणि घरातील सगळ्यांशी चर्चा करुन निर्णय घेईल. दादा सहज बोलून गेले. दादांची सगळीच वक्तव्ये गंभीर घ्यायची नसतात. 

परिवारात फूट पडल्यानंतर पवार कुटुंबीय सुप्रिया सुळेंच्या मागे ठामपणे उभे आहे. पुतणे, भाचे, चुलते, सगळे सुप्रिया सुळेंचा जोरदार प्रचार करत आहे. आता सुप्रिया सुळेंचा मुलगा आणि लेक देखील सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सुप्रिया सुळे यांची दोन्ही मुलं म्हणजेच लेक रेवती व मुलगा विजय हे सुद्धा आईच्या प्रचारासाठी सहभागी होणार आहेत. पार्थ पवार आणि रोहित पवार यांच्याप्रमाणे शरद पवारांची सख्खी नातवंडे अद्याप राजकीय आखाड्यापासून दूर असल्याने त्यांचे फारसे दर्शन घडत नाही.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती