सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 व्यक्ती विशेष

'आमचा उमेदवार निवडून येईल पण किती मताधिक्य मिळेल हे सांगायला ज्योतिष नाही' - उपमुख्यमंत्री अजित पवार

पुजा    25-04-2024 18:18:29

पुणे : शिरूर लोकसभेसाठी महायुतीकडून अधिकृत उमेदवार म्हणून शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज अर्ज भरला. जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे त्यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. त्यांचा अर्ज भरण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे, आमदार दिलीप मोहिते पाटील, आमदार अतुल बेनके उपस्थित होते. यादरम्यान प्रसार माध्यमांसमोर बोलताना त्यांनी शिरुर लोकसभा मतदारसंघातून आढळराव पाटील विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. किती मताधिक्याने आढळराव निवडून येतील?, असा प्रश्न अजित पवारांना विचारला होता. त्यावर, एक मिनिट.. मी त्यामधला ज्योतिषी नाही. पण, आमचा उमेदवार निवडून येईल एवढं मला माहिती आहे, असे उत्तर अजित पवारांनी हात जोडून दिले. 

शिरुर लोकसभा मतदारसंघात आढळराव पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे डॉ. अमोल कोल्हे यांच्यात थेट लढत आहे. गतनिवडणुकीत कोल्हे यांनी आढळराव पाटलांचा विरोध करुन दिल्ली गाठली होती. पण यावेळी अजित पवारांच्या बंडानंतर महायुतीमध्ये लोकसभा निवडणुकांसाठी जागावाटपात पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आली आहे. त्यामुळे गत लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवणारे आढळराव पाटील यांनी यंदा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर, त्यांना शिरुर लोकसभा मतदारसंघातून उमेदवाीर देण्यात आली असून आज  उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर आता गत निवडणुकीत  कोल्हेंच्या पाठिशी असलेले अजित पवार यंदा आढळराव पाटलांचा प्रचार करत आहेत. पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज मोठं शक्तीप्रदर्शन करुन रॅली काढण्यात आली. या रॅलीत अजित पवार गॉगल घालून सहभागी झाले होते. यावेळी, त्यांना विचारलेल्या विविध प्रश्नावर उत्तर देताना आपल्या उमेदवाराचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

या रॅलीदरम्यान शरद पवार यांच्या आज जाहीर झालेल्या जाहीरनाम्याबद्दल विचारले असता माझा त्या पक्षाची काहीही संबंध नाही, मी तो जाहीरनामा वाचला नाही, वाचल्याशिवाय उत्तर देणार नाही. तसेच, ते विरोधक असल्याने सत्ताधारी पक्षावर आरोप करणारच, ते त्यांचं कामच आहे. पण, देशात मोदी सरकारने अनेक काम केली आहेत. विरोधकच काम, विरोध करणे हेच आहे, असे अजित पवारांनी म्हटले.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती