सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 शहर

बांधकाम व्यावसायिक डीएसके यांच्या पुण्यातील कार्यालयावर ईडी कडून छापेमारीला सुरुवात

पुजा    19-04-2024 12:31:31

पुणे : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी हे एकेकाळी पुण्यातील बांधकाम व्यवसाय क्षेत्रातलं बडं प्रस्थ म्हणून ओळखले जात होते, पण गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. याच डी. एस. कुलकर्णी यांच्या बाबतीत एक मोठी बातमी समोर आली आहे. डीएसके यांच्या  पुण्यातील कार्यालयावर ईडीने छापेमारी सुरु केली आहे. 

मुंबईतून आलेले ईडीचे पथक शुक्रवारी (ता १९) पहाटेपासूनच डी.एस. कुलकर्णी यांच्या जंगली महाराज रस्त्यावर असलेल्या कार्यालयाची झाडझडती घेत आहेत. उद्योजक डी. एस. कुलकर्णी यांच्यावर गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. पुण्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात त्यांना अटक झाली होती. ५ वर्षांनंतर त्यांची जामिनावर सुटका झाली होती.  पण आता ते ईडीच्या कचाट्यात सापडले आहेत. मुंबईवरून आलेल्या ईडीच्या पथकाने त्यांच्या पुण्यातील कार्यालयावर आज, शुक्रवारी सकाळीच धाड टाकली. 

दरम्यान, याआधी उच्च न्यायालयाने विशेष न्यायालयाला आदेश दिले आहते की, डीएसके यांच्या जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलाव करुन लवकरात लवकर निर्णय घ्यावा, लिलावामधील योग्य मालमत्तेची यादी उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाने तीन आठवड्यात तयार करावी, असंही उच्च न्यायालयाने सांगितलं आहे. डीएसके यांच्या १९५ स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या. या मालमत्तेचा लवकरात लवकर लिलाव करुन ३५ हजार गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळावे यासाठी याचिका दाखल करण्यात आली. जप्त केलेल्या १९५ स्थावर मालमत्तांचा लिलाव करण्यास परवानगी द्यावी, असा अर्ज मावळ-मुळशीचे उपविभागीय दंडाधिकारी सुरेंद्र नवले यांनी येथील विशेष न्यायालयात केला. या सुनावणी घेताना मुंबई उच्च न्यायालयाने हा निकाल दिलाय.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती